टोमॅटोचे भाव कोसळल्याने बळीराजा संकटात

टोमॅटोचे भाव कोसळल्याने बळीराजा संकटात

ओझर : वार्ताहर :  टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 22 किलोचे एक क्रेट अवघ्या 100 रुपयांना जात आहे. या कमी बाजारभावात तोडणी व वाहतूक खर्चही निघत नाही. महागडी खते व औषधे घ्यायला परवडत नाही. एक महिन्यापूर्वी टोमॅटोला चांगला बाजारभाव होता. तेव्हा अनेक शेतकर्‍यांना लॉटरी लागली. परंतु सध्या बाजार पडल्याने बळीराजा चिंता व्यक्त करीत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात सकाळी 9 वाजताच टोमॅटो बाजार सुरू होतो. आजूबाजूच्या तालुक्यातून तर येथे विक्रीला टोमॅटो तर येतातच, परंतु बीड, श्रीगोंदा या भागांतून शेतकरी आपला माल विक्रीला आणत आहेत. सध्या आवक जास्त होत असल्याने व मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी झाला आहे.

यंदा पाऊस कमी असून, काही शेतकर्‍यांनी विकत पाण्याच्या टँकरने टोमॅटोला पाणी दिले आहे. मशागत, खते व औषधे यासाठी झालेला खर्च सुटत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. इतर राज्यांतूनही टोमॅटोची आवक होत असल्याने साधारण महिनाभर तरी बाजार भाव वाढणार नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. भाव पडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. किमान एका क्रेटला रुपये 500 इतका बाजारभाव मिळावा, अशी आपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news