

गणेश खळदकर
पुणे: चांगल्या दर्जाचे शिक्षण, तज्ज्ञ शिक्षकवर्ग, चांगल्या सुविधा अशा अपेक्षा मनात बाळगून लाखो रुपयांचे शुल्क भरून अनेक पालक आपल्या पाल्यांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवितात. मात्र, अनेक इंग्रजी शाळांतील बहुतांश शिक्षकवर्ग अनेकजण बी.एड, डी.एडबरोबरच साधी सीटीईटी, टीईटी, अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीही उत्तीर्ण नाहीत. जाणार्या शिक्षण व्यवस्थेत अशी स्थिती असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
आपले मूल इंग्रजी शाळेत शिकले की मोठा साहेब किंवा डॉक्टर, इंजिनियर बनेल असा अनेकांचा समज असतो. शिक्षण किंवा नोकरीमध्ये इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही, असाही समज निर्माण झालेला आहे. (Latest Pune News)
परंतु, ज्या शाळांमध्ये त्यांची मुले शिकतात. त्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक अर्हता नेमकी काय आहे, हे तपासण्याची तसदी पालक घेताना दिसत नाही. शिक्षक होण्यासाठी बी.एड, डी.एड, टीईटी, सीटीईटी, अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी आदी परीक्षा पदवी किंवा पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात अनेक इंग्रजी शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक संबंधित परीक्षा उत्तीर्णच नसल्याचे दिसून येत आहे.
खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांना सरकारी नियम लागू नाही, असा धादांत खोटा समज सर्वत्र पसरवण्यात आला आहे. संबंधित शाळांसाठी मान्यता सरकारकडून घ्यावी लागते. विविध अहवाल शिक्षण खात्याला व सरकारला सादर करावे लागतात. सरकारने नेमलेली पुस्तके अभ्यासाला ठेवणे बंधनकारक आहे.
सरकारी धोरणांप्रमाणे परीक्षा घेतात, दहावी-बारावीची परीक्षासुद्धा सरकारी मंडळेच घेतात, शासनाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासतात. परंतु, शिक्षकांची भरती करताना मात्र त्यांना वाटेल त्या पगारावर नोकरीवर ठेवले जाते. कमी पगारात शिक्षक नेमत असल्यामुळे त्यांच्या पात्रतेतदेखील तडजोड केली जात असल्याचे दिसून येत आहे.
विषयतज्ज्ञ नसतानाही शिकवतात विषय
कोणताही विषय कोणत्याही व्यक्तीकडून शिकवला जातो. त्यामुळे इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित शिक्षकांची शैक्षणिक अर्हता तपासण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकार्यांना विचारले असता लवकरच अशा शाळांमध्ये शिकवण्यात येणार्या शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हतेची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
इंग्रजी शाळांमध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त का?
इंग्रजी शाळांच्या संस्था नफेखोरीसाठी मुख्यत्वे करून तेथील शिक्षकांच्या वेतनावर जबर आघात करतात. त्यासाठी काही ठिकाणी कमीत कमी पगारात शिक्षक नेमले जात आहेत. त्यासाठी नियमांना धाब्यावर बसवून अप्रशिक्षित व शासनाच्या अर्हतेनुसार शैक्षणिक पात्रता नसलेले शिक्षक नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत असल्याचेदेखील जाणकारांनी स्पष्ट केले आहे.