

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा दोन दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची माहिती, तज्ज्ञांचे अभिप्राय महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची ग्वाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. दरम्यान, या नियोजित रस्त्यासाठी विविध मतप्रवाह येण्याची मालिका सुरूच आहे. मनसेने या रस्त्याला विरोध केला आहे, तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने हा रस्ता होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
नियोजित बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून 'पर्यावरणवादी विरुद्ध महापालिका' असा संघर्ष सुरू आहे. या रस्त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध वाढत असताना विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनीही विविध मते व्यक्त करत या वादात उडी घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने या रस्त्याला विरोध केला आहे. या रस्त्याला 250 कोटींहून अधिक खर्च येणार असून, जवळपास 1400 झाडे कापली जाणार आहेत. या पर्यायी रस्त्यामुळे लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कमी होईलच, हे स्पष्ट होत नाही.
संपूर्ण नियोजन नागरिकांसाठी खुले असावे. तोवर बालभारती ते पौड रस्ता जोडणार्या टेकडीवरील या रस्त्याचा विचार करू नये, असे निवेदन मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार दिले. या वेळी अनिल राणे, विशाल शिंदे
उपस्थित होते.
दरम्यान, हा रस्ता उन्नत असणार असून, या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा दोन दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. या प्रकल्पाची माहिती, तज्ज्ञांचे अभिप्राय महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची ग्वाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्याचेही संभूस यांनी सांगितले.
बालभारती ते पौड फाटा या पर्यायी रस्त्यामुळे नागरिकांना अनेक फायदे होणार आहेत. या पर्यायी रस्त्यामुळे पाच सिग्नल टाळता येणार असून, विनाअडथळा हे अंतर पार होणार आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील जवळपास 20 गल्ल्यांमधील नागरिकांना आपली वाहने सुलभरीत्या मुख्य रस्त्यावर आणता येणार आहेत. विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन या रस्त्याच्या परिसरात असलेल्या या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी सुलभरीत्या प्रवास करू शकतील. पर्यायी रस्त्यामुळे वाहतूक विनाअडथळा व वेगवान होऊन पुढील काळात कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे.
अॅड. नीलेश निकम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)