

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे रखडलेल्या बालभारती- पौड फाटा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका प्रशासनाला सोमवारी दिले. विधी महाविद्यालय आणि सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड फाटा या रस्त्याचे नियोजन केाले आहे. एकूण अडीच कि.मी. लांबीचा आणि 30 मीटर रुंदीचा हा रस्ता असून, त्यासाठी 252 कोटींचा खर्च येणार आहे. यामधील 900 मीटरचा रस्ता इलिव्हेटेड आहे.
दरम्यान, या रस्त्यासाठी बालभारती टेकडी फोडावी लागणार असून त्यामुळे जवळपास 1 हजार चारशे झाडांना बाधा येणार आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांसह काही नागरिकांचा या रस्त्याच्या कामास विरोध आहे. त्यामुळे या रस्त्याची निविदा प्रक्रिया रखडली होती. सोमवारी पालकमंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. त्यात या रस्त्यांबाबतही चर्चा झाली. त्यात पालकमंत्र्यांनी या रस्त्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार आता पालिका प्रशासनाकडून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
एकाच दिवसात भूमिका बदलली
बालभारती- पौड फाटा रस्त्याबाबत शिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळे व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत या दोन्ही नेत्यांनी या रस्त्याचे काम घाईगडबडीने आणि बळजबरीने हाती घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या आदेशाने आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.