

डोंबिवली : डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या खोणी पलाव्यातील भयंकर प्रकार उजेडात आला आहे. आजोबांच्या मोबाईलचा पासवर्ड बदलण्यावरून खोणी पलाव्यातील कासा एड्रियाना सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या एका कुटुंबात रक्तरंजित हिंसाचार झाला. आजोबा आणि मुलाने कंबरपट्ट्यासह स्वयंपाक घरातील कंबरपट्टा, लाटणे, कडीवाला तव्याच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात ४७ वर्षीय कुटुंबप्रमुख महिला रक्तबंबाळ झाली. या हल्ल्यात महिलेसह तिचा अन्य मुलगा देखिल जबर जखमी झाला असून तिघा माय-लेकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे एवढा गंभीर प्रकार घडूनही मानपाडा पोलिस ठाण्यातील गुन्हा दाखल करून तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने किरकोळ कलमे टाकून या गु्न्ह्याची नोंद करून घेतली. खुनाच्या प्रयत्नाचा हा गंभीर गुन्हा असुनही गुन्हा घडून चार दिवस उलटले तरी तपास अधिकारी या प्रकरणातील आरोपींना अटक करत नव्हता. या प्रकरणाला गती मिळेल यादृष्टीने प्रयत्न करत नव्हता, असेही उजेडात आले आहे.
एका जागरूक डोंबिवलीकराने जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर भाजपाच्या महिला ग्रामीण संघटक सुहासिनी उर्फ मनीषा राणे यांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्याशी संपर्क साधून या घटनेतील महिला आणि तिच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. या साऱ्या घडामोडीनंतर सुत्रे हलली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सूचनेनंतर वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याच्या ताब्यातून तपास काढून तो अन्य अधिकाऱ्याच्या ताब्यात दिला. प्रकरण इतके गंभीर असल्याने या गुन्ह्याची कलमे देखिल वाढविण्यात आल्याची माहिती भाजपाच्या पदाधिकारी मनीषा राणे यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी रामनगर पोलिस ठाण्यात देखिल यापूर्वी असाच कांड दोघा पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. शासनाच्या निर्देशांवरून हे दोन्ही अधिकारी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. तरीही पोलिसांकडून अशी गंभीर प्रकरणे हलक्याने घेत असल्याने तक्रारदारांसह नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी बिकाशकुमार गणेश यादव (२४) याने या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. बिकाशकुमार हा खोणी गावाजवळ असलेल्या पलावा कासा एड्रियाना येथे आई रेणू यादव, मोठा भाऊ आकाशकुमार (२६), आजोबा राजेंद्र राय (७६), आजी मालतीदेवी (७०) असे एकत्र राहतात. बिकाशकुमारचे वडील पूर्वीपासून कुटुंबापासून विभक्त राहत आहेत.
आजोबा राजेंद्र राय हे सेवानिवृत्त आहेत. त्यामुळे त्यांना निवृत्ती वेतन मिळते. गेल्या आठवड्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र राय यांनी रेणू यादव यांना जाब विचारला. तुझा मुलगा बिकाशकुमार काहीच काम करत नाही. माझ्या निवृत्ती वेतनावर मी तुम्हाला किती दिवस पोसू ? शिवाय माझ्या मोबाईलमधील पासवर्ड (पीन क्रमांक) कुणी बदलला ? असे विचारताच आजोबांच्या मोबाईलचा पासवर्ड पीन आजोबांच्या सूचनेवरून बदलल्याचे आकाशकुमार याने सांगितले. यावरून बिकाशकुमार आणि आकाशकुमार या दोन्ही भावांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.
स्वयंपाक घरातील तवा, लाटणे हाणामारीसाठी वापरण्यात आले. यात बिकाशकुमार गंभीर जखमी झाला. आई रेणू भांडण सोडविण्यासाठी मधे पडली तर तिच्यावरही आकाशकुमारने हल्ला चढविला. आजोबा राजेंद्र यांनी चामडी पट्ट्याने रेणू यांना मारहाण केल्याचे बिकाशकुमार याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. यादव यांच्या घरातील भांडणाचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी धावून आले. शेजारधर्म म्हणून सर्वांनी मिळून हा वाद सोडविला. घरात पडलेला रक्ताचा सडा पाहून रहिवासी हादरले. रहिवाशांनी या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या बिकाशकुमारसह त्याची आई रेणू यादव या दोन्ही माय-लेकाला उचलून तातडीने रूग्णालयात हलविले. सद्या माय-लेकाची प्रकृती ठीक आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.