कोरेगाव भीमा : हवेली तालुक्यातील बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी सन 2017 मध्ये सुरू केलेले हरित स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असून, त्यांची वनराई आता ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून प्रसिद्ध होत आहे. पर्यावरणप्रेमींसाठी ही एक प्रेरणादायक कहाणी ठरते आहे.
कोणताही गाजावाजा न करता, केवळ श्रमदान आणि निसर्गनिष्ठेच्या आधारावर ही वनराई साकारली आहे. वारघडे यांच्या कुटुंबासह परिसरातील विविध संस्था व स्थानिक नागरिकांनी या वनराईच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेतला. येथे देशी व औषधी प्रजातींच्या 100 हून अधिक प्रकारची झाडे लावली आहेत.
वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुन, उंबर, जांभुळ, आवळा, कदंब, पारिजातक, बकुळ, रुद्राक्ष, सप्तपर्णी अशा अनेक प्रजातींचा समावेश असलेल्या या सघन वनराईत सध्या 1 लाखांहून अधिक झाडे निसर्गाशी संवाद साधत उभी आहेत. ही हरित पट्टी केवळ वृक्षसंवर्धनापुरती मर्यादित नसून, हजारो पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास ठरली आहे. नोव्हेंबर ते जूनदरम्यान पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय केली जाते. परिणामी, स्थलांतर कमी झाले असून विविध जातींचे पक्षी येथे अधिवास करत आहेत. याशिवाय प्राणी व सरपटणार्या प्राण्यांसाठी नैसर्गिक आश्रयस्थाने आणि पाणवठेही तयार करण्यात आले आहेत.
फक्त वृक्षारोपण नव्हे, तर पावसाचे पाणी जमिनीत शोषून घेण्यासाठी वारघडे यांनी ‘छत्रपती जलाशय’, हजारो जलशोषक खड्डे आणि नाल्यांचे खोदकाम करून आजवर 2 कोटी लीटरहून अधिक पाणी जमिनीत मुरवले आहे. बकोरीसह केसनंद व पिंपळे-जगताप परिसरातही 2 लाखांहून अधिक झाडांची लागवड आणि देखभाल सुरू आहे. ‘या वर्षी पावसाचे आगमन चांगले होईल, प्रत्येकाने एक तरी झाड लावावे,’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.