पिंपरखेड(ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : पिंपरखेड येथील बैलगाडा घाटात ग्रामदैवत तुकाईदेवी यात्रोत्सवानिमित्त सुमारे 300 बैलगाडे धावले. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या सर्व बैलगाडामालकांना चषकासह साडेतीन लाखांहून अधिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तर धार्मिक विधी, पालखी मिरवणूक, भेदीक, तमाशा आदी कार्यक्रमांनी यात्रोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला.
राज्यात प्रथमच लोकसहभागातून 35 लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या नवीन घाटावर दोन दिवस पार पडलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये दिवंगत किसन गावडे (देवगाव) यांच्या बैलगाड्याने 'घाटाचा राजा' बहुमान मिळवला. तसेच दिवंगत सचिन भंडलकर (राजगुरुनगर) व दिवंगत दगडू ढोमे (पिंपरखेड) हे फायनलचे मानकरी ठरले. प्रथम फळीफोडचे मानकरी बाळासाहेब पांडे (शिंगवे) व रोहित बोर्हाडे (पारगाव) यांचे बैलगाडे ठरले.
जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, संचालक सावित्रा थोरात, उद्योजक विकास दाभाडे, निवृत्त पोलिस अधिकारी दयानंद ढोमे, गोपाळ दाभाडे उपस्थित होते. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणा घोडे, रवींद्र करंजखेले, शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखिले यांनी यात्रेत सहभाग नोंदवला. बैलगाडा शर्यतीसाठी माजी सभापती शिवाजी चव्हाण, बाळासाहेब टेमगिरे, सुनील डुकरे, बबन मेंगडे, सुभाष लांडगे, अजिंक्य बालगुडे, दिनेश पिंगळे, माजी उपसरपंच दिलीप बोंबे, दामू दाभाडे यांनी, नीलेश गावशेते, सुधाकर खांडगे यांनी काम पहिले.