पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणार्या यात्रा, जत्रा, उत्सव आदी प्रसंगी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनास परवानगी देण्यात यावी. मात्र, राजकीय कार्यक्रम, वाढदिवस आदी प्रसंगी या शर्यतींचे आयोजन करण्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देण्यात येऊ नये, असे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे.
राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित घटनापीठाने 18 मे रोजी काही अटी-शर्तींवर परवानगी दिलेली आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2017 मधील तरतुदीनुसार बैलगाडा शर्यतीच्या आयोजनासाठी निश्चित केलेले नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत न्यायालयाने बजावले आहे. त्यानुसार, याबाबतच्या नियम व अटी/शर्तींचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबतच्या कायद्यानुसार राज्यात केवळ बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अशा प्रकारच्या एक हजार मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडा शर्यतीस परवानगी आहे. राज्यात अनधिकृतपणे आयोजित होणार्या आरत पारत, बैल-घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगुट्टा, समुद्रकिनार्यावरील शर्यती, टक्कर तसेच 1 हजार मीटर अंतरापेक्षा जास्त अंतराच्या इतर बैलगाडा शर्यती प्रतिबंधित असणार आहेत, असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच, ही शर्यत नियम व शर्तीनुसार आयोजित केली आहे, याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीच्या (एसपीसीए) सदस्यांची एक समिती जिल्हाधिकार्यांनी गठित करणे अपेक्षित आहे. या समितीमध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचा प्रतिनिधी, बैलगाडा शर्यती आयोजित होत असलेल्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार), अशासकीय सदस्य अशी समिती गठीत करण्यात येईल. ही समिती आपला स्वतंत्र अहवाल शर्यतीनंतर 72 तासाच्या आत जिल्हाधिकार्यांना सादर करेल.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली असल्याने त्या काटेकोर पद्धतीने होण्यासाठी व पुढील कालखंडात अविरतपणे टिकून राहण्यासाठी काही नियम करणे आवश्यक होते. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने तयार केलेल्या नवीन नियमावलीचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमार्फत (महाराष्ट्र राज्य) स्वागत करतो. संघटनेने बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी 11 वर्ष लढा दिलेला आहे. आता शर्यती चालू झाल्या असल्या तरी यापुढील काळात राज्य शासनाचा बैलगाडा शर्यतीचा कायदा, नियम व अटींच्या अंमलबजावणी संदर्भात तसेच शर्यतीतील गैरप्रकारांच्या विरोधात संघटना खंबीरपणे भूमिका घेणार आहे.
– संदीप बोदगे, अध्यक्ष,
अखिल भारतीय बैलगाडा संघटना (महाराष्ट्र राज्य)