पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच मंगळवारी (दि. 9) सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी द्राक्ष, डाळिंब बागांसह गहू, ज्वारी, कांदा, तरकारी आदी पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. ढगाळ वातावरण, दाट धुके आणि अवकाळी पाऊस यामुळे पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकर्यांना औषध फवारणी करावी लागणार आहे. परिणामी शेतकर्यांच्या खर्चात वाढ होणार असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
बारामती शहर व परिसरात मंगळवारी (दि. 9) सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला असून थंडीने बारामतीकर कुडकुडले. अचानक आलेल्या पावसाने बारामतीकरांची तारांबळ उडाली. शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साठले होते. शाळा, महाविद्यालये तसेच कामाच्या ठिकाणी जाण्यार्या नागरिकांची पावसाने चांगलीच दैना उडाली.
बारामती तालुक्यात मंगळवारी सूर्यदर्शन तर झाले नाहीच. उलट पाऊस व थंडगार हवा यामुळे हुडहुडी भरण्याची वेळ नागरिकांवर आली. गेल्या तीन महिन्यांपासून वातावरणातील बदलाला नागरिक सामोरे जात आहेत. अनेकदा ढगाळ वातावरण तयार होत आहे. वातावरणातील बदलामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान बालके यांना सर्दी-पडशाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेकजण रुग्णालयात दाखल होताना दिसत आहेत.
बारामती शहर, औद्योगिक परिसर, जळोची, तांदुळवाडी, रुई, मोरगाव रोड, फलटण रस्ता, नीरा रोड या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सध्या थंडी सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न बारामतीकरांना पडला आहे. अनेकांनी गरम कपडे वापरण्याऐवजी पावसाळी कपडे घालने पसंत केले. दिवसभर थंडीने बारामतीकर बेचैन झाले होते. हवामान विभागाने अजून दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी मात्र काळजीत सापडला आहे. थंडी, उन्हाळा व सध्या सुरू असलेला पावसाळा अशा तीन ऋतूंचा बारामतीकर सामना करत आहेत.
मंगळ वारचा पाऊस व वातावरण यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. गहू, हरभर्याची पिके आता कुठे चांगली तरारू लागली होती. या वातावरणामुळे त्यावर तांबेरा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरकारी पिकांसाठीही हे वातावरण अत्यंत नुकसानीचे असून द्राक्ष बागायतदारांच्या तर तोंडचे पाणी पळाले आहे.
ढगाळ वातावरण व मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पंधरा दिवसांवर द्राक्ष तोडणीस आली असताना अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने अजून पुढील दोन दिवस पावसाळी वातावरणाचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे द्राक्षाच्या घडांना तडे जाण्याचा मोठा धोका आहे.
जुन्नर तालुक्यात सुमारे सहा हजार एकर क्षेत्रात विविध जातीच्या द्राक्ष बागा आहेत. गुंजाळवाडी काळवाडी , पिंपरी पेंढार, गोळेगाव या गावांमध्ये द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. सप्टेंबरअखेर छाटणी झालेल्या द्राक्ष बागा पुढील आठ ते दहा दिवसांत काढणीस तयार होणार आहेत. जानेवारी अखेर द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू होईल.
ऑक्टोबर महिन्यात छाटणी झालेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षाचे घड पाणी सुटण्याच्या, रंग येण्याच्या अवस्थेत आहेत. तालुक्यात 26 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी सुमारे पन्नास मिलिमीटर अवकाळी पाऊस पडला होता त्याचा सर्वाधिक फटका फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने बुरशीनाशक औषध फवारणी करावी लागली.फुलगळ व फळकूज झाल्याने निर्यातक्षम जम्बो जातीच्या द्राक्ष घडातील मणी फुटण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागांच्या छाटणीनंतर सातत्याने रोगट हवामान राहिल्याने यावर्षी द्राक्ष बागांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ झाली असल्याचे पिंपरी पेंढार येथील शेतकरी रामदास जाधव यांनी सांगितले.