

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा : वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील वाडा फाट्यावरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाल्याने सात ते आठ दिवस या रस्त्याच्या एका बाजूने खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी
साठून राहिले होते. वाडा फाटा येथील चौकातून हे साठलेले पाणी आठ दिवस सतत वाहत रस्त्याच्या पलीकडे जात होते.
येथील रस्त्याचा काही अंशही पाण्यासोबत वाहून गेल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक या खड्ड्यात कोसळले जात असून छोटे मोठी दुर्घटना घडत आहेत. बहुतांश रात्रीच्या सुमारास प्रवास करताना अचानक समोर आलेला खड्डा पाहून वाहन चालकांचे संतुलन बिघडत आहे. संपूर्ण रस्त्यावर एकही पथदिवा नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना हे खड्डे दिसून येत नाही. यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूने पथदिवे लावण्याची अनेकदा मागणी करूनही वाडा ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत आहे.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील पथदिव्यांच्या अभावाबाबत दैनिक पुढारी प्रतिनिधीने ग्रामपंचायतशी चर्चा केली होती. तेव्हा आम्ही लवकरच पथदिवे बसविणार असल्याचे सांगण्यात आले होते.परंतु अजूनही या पथदिव्यांची काम केली नसल्याने वाहन चालक व पादचारी प्रवाश्यांना अंधारातच प्रवास करण्याची वेळ आली आहे. तरी लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवून संपूर्ण रस्त्याच्या बाजूने पथदिवे लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.