पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था ! हडपसर परिसरात स्थिती

पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था ! हडपसर परिसरात स्थिती
Published on
Updated on

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे हडपसर परिसरातील रस्त्यांची सध्या बिकट अवस्था झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

भोसलेनगर, मगरपट्टा सिटी परिसर, महादेवनगर, ससाणेनगर या भागातील रस्त्यांवर सध्या जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या मध्यभागी असलेली चेंबरची झाकणे खाली दबल्यामुळे रस्त्यांवर असमतोल निर्माण झाला आहे. यामुळे अपघाताही होत आहेत. रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
ससाणेनगर येथील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही दखल घेतली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र कांबळे, संतोष खरात यांनी सांगितले.

हडपसर भाजी मार्केटसमोर मोठा खड्डा पडल्याने रहदारीस अडथळा होत आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागील मुख्य रस्त्याचीही सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. ससाणेनगर परिसरातील नवनाथ चौक ते रेल्वे क्रॉसिंगदरम्यानच्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत.

पावसाचे पाणी खड्ड्यांत साचून राहत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. काही ठिकाणी डांबर टाकून केवळ दुरुस्तीचा दिखावा केला जात आहे. हे डांबर अल्पावधीत उखडून पुन्हा खड्डे 'जैसे थे' होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरातील रस्त्यांची केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता डांबर टाकून व्यवस्थित खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हडपसर परिसरात रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, पाऊस थांबल्यानंतर तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.

– प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news