

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या परीक्षांचा सुरू असलेला काळ तसेच लहरी वातावरणामुळे आंबा पिकण्याची प्रक्रिया मंदावल्याने बाजारात फळांचा राजा हापूसकडे पुणेकरांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सध्या 800 ते 1200 रुपये डझन या भावाने हापूसची विक्री सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत बाजारात हापूस मुबलक असून, भावही कायम असल्याचे विक्रेत्यांच्या वतीने सांगण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्ष म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याला मोठी मागणी राहते. त्यानुषंगाने बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत आहे. मात्र, परीक्षांचा काळ सुरू असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत.
तसेच, सकाळच्या सुमारास थंडी, दुपारी उष्णता, त्यात अधूनमधून पडणार्या पावसाच्या सरींमुळे आंबा तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यात महागडा आंबा घेऊन तो पाडव्याच्या दिवशी तयार झाला नाही तर, अशी काळजी आणि खराब होण्याची धास्ती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे बाजारात 50 ते 60 टक्के मालाला उठाव असल्याचे चित्र आहे. बाजारात यंदा आंबा दर्जेदार असून, चांगल्या प्रतीचा आहे. येत्या काळात वातावरणावर सर्व गोष्टी अवलंबून राहतील, अशी माहिती व्यापारी वर्गाकडून देण्यात आली.
दररोज चार हजार पेट्यांची आवक
शहरासह जिल्ह्याला हापूसचा पुरवठा करणार्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागात देवगड, रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला येथून आंब्याची आवक होत आहे. बाजारात दररोज 4 ते 10 डझनाच्या चार हजार पेट्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात कच्च्या हापूसच्या 4 ते 6 डझनाला अडीच ते साडेचार हजार रुपये, तर 7 ते 8 डझनाच्या पेटीला 2 ते 4 हजार रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात एका डझनाची 800 ते 1200 रुपये दराने विक्री होत आहे.