

पुणे: बह्मांडाचा प्रचंड पसारा मोजण्यासाठी पुण्यातील आयुका (खगोल भौतिकशास्त्रीय आंतरविद्यापीठ केंद्र) या संस्थेतील खगोल शास्त्रज्ञांनी एक भूमितीय चाचणी शोधून काढली आहे. खूप दूरवर असणाऱ्या आकाशगंगेचा अभ्यास करताना अभिनव भूमितीय पद्धत, ‘शिअर रेशियो’ ही नवी पद्धत शोधली आहे.
फार दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या अतिशय क्षीण प्रकाशाच्या आधारे विश्वाचा इतिहास, रचना उलगडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ करत आहेत. या आकाशगंगांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचताना जवळच्या आकाशगंगांच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो वाकतो, विकृत होतो. या प्रक्रियेला ‘गुरुत्वीय लेन्सिंग’ असे संबोधले जाते. या तंत्राच्या साहाय्याने विश्वातील पदार्थांचे, विशेषतः अदृश्य ‘डार्क मॅटर’चे नकाशे तयार केले जातात आणि विश्वातील रचनांची वाढ कशी होते, याचा अभ्यास केला जातो.
रेडशिफ्टऐवजी ‘शिअर रेशियो’
या संशोधनात ‘रेडशिफ्ट’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. विश्वाच्या प्रसरणामुळे प्रकाश किती ताणला गेला आहे, याचे मोजमाप म्हणजे रेडशिफ्ट. मात्र, यातील अनिश्चिततेमुळे विश्वाच्या विविध वैश्विक परिमाणांच्या मोजमापात निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक आकाशगंगेचा अचूक रेडशिफ्ट मोजणे वेळखाऊ असल्याने, शास्त्रज्ञ प्रामुख्याने आकाशगंगांच्या रंगांवरून त्याचा अंदाज लावतात. ही पद्धत पूर्णतः अचूक नसून, त्यात त्रुटी राहतात. आयुकातील खगोलशास्त्रज्ञांनी याच समस्येवर उपाय म्हणून एक अभिनव भूमितीय पद्धत, ‘शिअर रेशियो’चा वापर केला आहे. नेदरलँडमधील लाईडन विद्यापीठातील संशोधक डॉ. दिव्य राण, प्रा. सुहृद मोरे संशोधक, आयुका, पुणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
असे होते मोजमाप
या पद्धतीत एका पार्श्वभूमी संचातील आकाशगंगांवरच लक्ष केंद्रित न करता, समोरील एकाच आकाशगंगांच्या संचांनी वेगवेगळ्या रेडशिफ्टवर असलेल्या पार्श्वभूमी आकाशगंगांच्या प्रकाशाला कशा प्रकारे वाकवले, याची तुलना केली जाते. या तुलनेमुळे वायू, तारे आणि आकाशगंगा निर्मितीशी संबंधित गुंतागुंतीचे घटक आपोआप नगण्य ठरतात आणि विश्वाच्या भूमितीचे एक मोजमाप मिळते.
भविष्यातील मोठ्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षणांमध्ये रेडशिफ्टमधील अनिश्चितता ही एक मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. या अभ्यासातून ‘शिअर रेशियो’ पद्धत रेडशिफ्ट मोजमापांची पडताळणी करण्यासाठी प्रभावी आणि स्वतंत्र साधन ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
प्रा. सुहृद मोरे, शास्त्रज्ञ, आयुका