पुणे : शेकडो झाडांवर कुर्‍हाड; पर्यावरणाची हानी

पुणे : शेकडो झाडांवर कुर्‍हाड; पर्यावरणाची हानी
Published on
Updated on

भरत मल्लाव :

भिगवण : कोट्यवधी रुपये खर्चाचा बारामती-भिगवण रस्ता एका बाजूने मातीत चालला असताना आता याच रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करताना अडथळा ठरणा-या 25 ते 50 वर्षांच्या शेकडो जुन्या झाडांवर कुर्‍हाड चालवून पर्यावरणाची मोठी हानी करण्यात आल्याचे माहिती अधिकारात आढळून आले आहे. अडथळा ठरणारी मंजूर झाडे व प्रत्यक्षात तोडण्यात येणार्‍या झाडांच्या संख्येतही कमालीची तफावत असल्याने झाडांवर करवत चालवणारा यातील 'पुष्पा' कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बारामती-भिगवण ते खानवटे या राज्यमार्ग क्र. 54 च्या रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम आशियाई विकास बँक कार्यक्रमांतर्गत सध्या सुरू असून, या मार्गाचे काम करताना अडथळा ठरणार्‍या झाडांची तोड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे व सुरूही आहे. या मार्गावर इंदापूर हद्दीत वड व चिंचेची 70 हून अधिक झाडे असताना कागदोपत्री केवळ 15 व एकूण 228 झाडे दाखवण्याची किमया भिगवणच्या बांधकाम विभागाने दाखवत यात मोठा झोल केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तोडण्यात येणार्‍या झाडांची किंमत कमी व्हावी यासाठी झाडांचे आकारमान (गोलाई रुंदी) सुद्धा कमी दाखवण्यात आले आहे.

या राज्यमार्गाच्या रुंदीकरणात दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची शेकडो जुनी व मोठी झाडे असताना प्रत्यक्षात मात्र 228 झाडेच दाखवण्यात आली आहेत. यासाठी भिगवणच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाने इंदापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली व त्याप्रमाणे वनविभागाने त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत रितसर परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे अडथळा ठरणार्‍या झाडांची लिलाव प्रक्रिया करून कुरकुंभच्या ठेकेदाराला उच्चतम बोलीत सर्व करांसहित 2 लाख 40 रुपयात मंजुरी देण्यात आली असून, त्याप्रमाणे संबधित ठेकेदारानेही बिनधास्तपणे सर्व झाडांवर करवत चालवली आहे.

यामध्ये वड, चिंच, लिंब, बाभूळ, शिसम, गुलमोहर, उंबर, पिंपळ, जांभुळ, तरवड, महरुख, रायवळ, बदाम आदी जातींच्या झाडांचा समावेश आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात ठेकेदाराला दुप्पट म्हणजे 456 झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. असे असले तरी नियमानुसार तोडण्यात येणार्‍या झाडांची संख्या कमालीची कमी दाखवली आहे व प्रत्यक्षात मात्र बेसुमार व सरसकट झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे : रकटे
याबाबत शेटफळगढे येथील संतोष रकटे यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रकटे म्हणले की, शेटफळगढे भागातच वडाची 19 पेक्षा अधिक झाडे होती. पिंपळे, लामाजेवाडी, मदनवाडी, डिकसळ भागातही वड व चिंचेची भरपूर प्रमाणात झाडे होती व वर्षानुवर्षे ही झाडे सर्वांनी डोळ्यांनी पहिली आहेत; मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठा र्‍हास करण्यात आला आहे. त्यामुळे या अनागोंदी व मनमानी कारभाराची चौकशी होणे गरजेचे असल्याचे रकटे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news