

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'हर घर तिरंगा' या अभियानांतर्गत टपाल कार्यालयाच्या वतीने बाईक रॅलेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टपाल विभागाने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्याचे कार्य या रॅलीच्या माध्यमातून केले. या अभियानाचा एक भाग म्हणून पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या वतीने महात्मा गांधी रोड, पुणे कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या रॅलीची सुरुवात जीपीओ येथून सुरू होऊन सांगतादेखील याच कार्यालयाच्या आवारात झाली. या रॅलीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक डॉ. अभिजित इचके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. नागरिकांनी घरावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन इचके यांनी केले. दरम्यान, पुणे ग्रामीण डाकघरचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे म्हणाले, 'भारत सरकारने टपाल विभागावर हर घर तिरंगा ही मोहीम सोपविली आहे. त्या अनुषंगाने सर्व टपाल कार्यालयात राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तिरंगा विक्री आणि डिलीव्हरीसाठी नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा.'
टपाल खात्यातर्फे 1 ऑगस्टपासूनच राष्ट्रध्वजाची विक्री सुरू करण्यात आली आहे. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान, 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असल्याने नागरिकांसाठी टपाल खात्याने राष्ट्रध्वजांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती टपाल खात्याच्या सिनिअर सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस (वेस्ट डिव्हिजन) रिप्पन डुल्लेट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी रिप्पन डुल्लेट यांनी सांगितले की, टपाल कार्यालयांत 14 ऑगस्टपर्यंत राष्ट्रध्वज उपलब्ध असतील. ऑनलाइन मागणी करणार्या नागरिकांना घरपोच डिलिव्हरी देण्यात येईल. त्यासाठी रविवारी (दि.13) पोस्टमन कामावर हजर राहतील. आमच्याकडे वीस हजार कापडी राष्ट्रध्वज आले आहेत. कार्पोरेट सेक्टर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांकडूनदेखील राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मागील वर्षी पूर्व आणि आणि पश्चिम विभागातर्फे प्रत्येकी 27 हजार राष्ट्रध्वजांची विक्री करण्यात आली होती. या वर्षीदेखील राष्ट्रध्वज केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले असून, नागरिकांपर्यंत जनजागृती करण्याची जबाबदारी टपाल खात्यावर सोपविण्यात आली आहे. कापडी राष्ट्रध्वज 20 इंच बाय 30 इंच आकाराचा आहे. एखादी व्यक्ती कमीत कमी पाच राष्ट्रध्वज ऑनलाइन मागवू शकते. घरोघरी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा तसेच राष्ट्रध्वजाचा मानदेखील राखावा, असे आवाहन रिप्पन डुल्लेट यांनी केले आहे.