पुणे; पुढारी वृत्तसेवा : अन्न, वस्त्र, प्रयोग, मनोरंजन किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी सर्व जलचर प्राण्यांना वापर, शोषण, अत्याचार आणि क्रूरतेपासून मुक्त जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी 'व्हेगन इंडिया मुव्हमेंट'तर्फे पुण्यातील कार्यकर्त्यांनी 'फील देअर पेन' (जाणूया त्यांच्या वेदना) या ब्रीदवाक्यांतर्गत शाकाहारी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात व्हेगन इंडिया मुव्हमेंटच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हातातील लॅपटॉप आणि टॅबव्दारे विविध उद्योगांमध्ये जलचर प्राणी सहन करत असलेल्या भीषणतेची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रदर्शित केल्या. माणसाच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी जलचर प्राण्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या भीषण वास्तवाची जाणीव नागरिकांना करून देणे आणि त्यांना शाकाहारी होण्यासाठी प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या वेळी प्राणी मुक्ती कार्यकर्ता अमजोर चंद्रन म्हणाले, 'सात वर्षांपूर्वी मी शाकाहाराचा स्वीकार केला आहे. असे अनेक भारतीय पदार्थ आहेत जे शाकाहारी (वीगन) आहेत. एकदा तुम्ही त्या मानसिकतेत आल्यानंतर कोणालाही शाकाहारी होणे सोपे जाते. त्यामुळे मांसाहार आणि प्राण्यांच्या अन्य उत्पादनांचा वापर करून प्राण्यांना होणारे दुःख आणि वेदनांमध्ये अधिक भर घालू नये. या प्राण्यांच्या दुःखात योगदान देऊ नये, अशी खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्राण्यांचे हक्क ओळखून ते जपण्यासाठी व्हेगन मुव्हमेंट भारतासह जगभरात वेगाने वाढत आहे. कारण ही चळवळ केवळ सर्व प्राणिजन्य उत्पादनांच्या वापराला विरोध करीत नाही, तर ती पर्यावरणीयदृष्ट्यादेखील महत्त्वपूर्ण आहे.