सिताराम लांडगे:
लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील प्रस्तावित रिंगरोडच्या बाधित जमिनीच्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यापूर्वीच मोबदला विलंबाचा गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या रिंगरोड बाधित जमिनी स्वस्तात लाटण्याचा उद्योग पूर्व हवेलीतील 'लँड माफिया'च्या टोळीने चालविला असून यात अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. या टोळक्यात महसूल विभागाच्या काही महाभागांचाही समावेश आहे. पैशाच्या लालचेपोटी शेतकऱ्यांची कुटुंबे देशोधडीला लावण्याचा प्रताप या टोळक्याकडुन सुरू आहे . पुणे शहराच्या चारही बाजूने वाहतूक विखुरली जावी म्हणून रस्ते विकास महामंडळाच्या वतीने प्रस्तावित रिंगरोडचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पूर्व हवेलीतील भावडी, लोणी कंद,बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ,सोरतापवाडी, आळंदी म्हाताबो,लोणी काळभोर,वडकी, होळकरवाडी,हांडेवाडी, वडाचीवाडी या गावातून रिंगरोड जात आहे.
या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतात त्या जमिनींच्या प्राथमिक प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत, मोजणी झाली आहे, विविध खात्याच्या मुल्यांकनाच्या प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या मुल्यांकनाच्या पाचपट किंवा ज्या- ज्या गावात सर्वात जादा दराने झालेल्या खरेदी खतांच्या पाचपट नुकसान भरपाई मिळणार आहे. हवेली तालुक्यात जमिनीचे दर कोट्यवधीच्या घरात असल्याने बाधित शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे असे असताना या भागातील सोकवलेले लँड माफिया व यांना मिळालेले महसूलचे काही ठग संगनमताने शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.
रिंगरोडला वेळ लागणार आहे, मोबदला लवकर मिळणार नाही. कदाचित रिंगरोड रद्द होईल अशी भिती शेतकऱ्यांमध्ये पसरवत आहेत व या टोळक्यात सहभागी असलेले महसूलचे ठग दुजोरा देत असल्याने बाधित शेतकऱ्यांना बाधित जमिनी विक्री करण्यास भाग पाडले जाते. केवळ लाखो रुपयांच्या टोकन रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या कष्टाच्या जमिनिवर कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारणारी टोळी पूर्व हवेलीत सक्रिय आहे. या टोळीने आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना गंडवले आहे. यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पुणे शहराच्या चारही बाजूने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने प्रस्तावित रिंगरोडच्या कामाचे नियोजन सुरू आहे. प्राथमिक प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत. मुल्यांकनाचे काम झाले आहे. पश्चिम हवेलीत शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यानंतर पुर्व हवेलीतील भरपाई प्रक्रिया सुरू होईल. खात्रीशीर भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोणाच्याही खोट्या अफवा व भुलथापाना शेतकऱ्यांनी बळी पडु नये काही शंका अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी आपली फसवणूक करुन घेऊ नये
-संजय आसवले, उपविभागीय महसूल अधिकारी हवेली