नानगाव : सेफ्टी दरवाजामुळे फसला चोरीचा प्रयत्न

नानगाव : सेफ्टी दरवाजामुळे फसला चोरीचा प्रयत्न

नानगाव(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : नानगाव येथील गणेशरोड भागातील व गावठाणाजवळील माउली खळदकर यांच्या घरी शनिवारी (दि. 6) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला; मात्र घराच्या वरच्या मजल्याला सेफ्टी दरवाजा असल्याने चोरट्यांना घरात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सकाळी यवतचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत पाहणी केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पहाटेच्या सुमारास माऊली खळदकर यांच्या घरी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी घरात महिला व मुली असे तीन जण होते. घरातील मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. चोरट्यांनी घराच्या मागच्या खिडकीच्या सज्जावरून प्रवेश केला. घरातील वरच्या दरवाजाला सेफ्टी लोखंडी दरवाजा होता, त्यामुळे त्यांना घरात प्रवेश करता आला नाही. तसेच घरावर गहू ठेवण्याची पत्र्याची कणगी होती. चोरट्यांनी कणगीचे झाकण उघडले आणि ते खाली पडले.

झाकण पडल्याचा आवाज आल्यावर घरातील एक मुलगी उठली आणि ती घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीच्या दिशेने सरसावली. खिडकीत कोणीतरी उभे आहे व एक व्यक्ती त्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर पाय देऊन उतरत असल्याचे तिला दिसून आले. खिडकीच्या आत उभ्या असलेल्या मुलीने प्रसंगावधान दाखवत धाडसाने हातामध्ये भाजीपाला चिरण्याचा चाकू घेतला व खिडकीजवळ लपत खिडकीत उभ्या असलेल्या चोराच्या बाजूने मारला. तो चाकू चोराला लागला व त्या चोरट्याला इजा झाली. तेवढ्यात खिडकीत उभा असलेला व त्याच्या खांद्यावर असलेला असे दोघेही चोर खाली पडले व तोल सांभाळत त्यांनी तिथून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी मुलीने पोलिसांना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news