

नसरापूर (ता. भोर); पुढारी वृत्तसेवा : भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे यांच्या घरात दिवसाढवळ्या शिरण्याचा प्रयत्न करून चोरी करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. यातील एकाला पाठलाग करून पकडण्यात आले. इतर चोरट्यांनी कारमधून पलायन केले. घटनेतील चोरटे आंतरराज्यीय टोळीशी संबंध असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोहम्मद अब्दुल सलाम सबदार (वय 31, रा. हापूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
ही घटना शनिवारी (दि. 17 ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कापूरव्होळ येथे घडली. पुणे-सातारा महामार्गालगत रोहन बाठे यांचे हॉटेल व घर आहे. चोरट्यांनी घराच्या कंपाउंडमधून प्रवेश करून जिना चढून दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी बाठे यांचे काका संदीप बाठे यांनी चोरट्यांना हटकले असता चोरटे पळू लागले. यातील एकाला पाठलाग करून तरुणांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. इतर चौघे दिल्ली पासिंग काळ्या रंगाच्या कारमधून पळून गेले. वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे चोरी करण्यासाठी बाठे यांच्या घराच्या अंगणात शिरले. तीन चोरटे हरिश्चंद्री येथे कारमध्ये थांबले. इतर दोघे कुलूप तोडत असताना फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर चोरटे पळाले. मोहम्मद सबदार या चोरट्याने महामार्गावर शिवशाही बसमध्ये प्रवेश करून बसच्या दरवाजाच्या काचा फोडत चालकाला शिव्या देऊन बस पळविण्याची धमकी दिली. गोंधळ झाल्याने त्याने धावत्या ट्रकला सिनेमा स्टाईलने लटकून पलायन करण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी दुचाकीवर पाठलाग करून मोहम्मद याला केळवडे गावच्या हद्दीत पकडले. या वेळी त्याने स्वतः जमिनीवर डोके फोडून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.