

पुणे : आपल्या पत्नीचे कान भरते, त्यामुळे ती आपल्याशी भांडण करून आपल्याजवळ राहत नाही, असा समज करून घेऊन नातजावयाने 74 वर्षांच्या सासूच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कात्रज येथील महादेव मंदिराजवळ बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
याप्रकरणी रत्नाबाई लगस (वय 74, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल शिंदे (रा. उत्तमनगर) याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल शिंदे हा फिर्यादी यांचा नातजावई आहे. फिर्यादी या आरोपीच्या पत्नीस शिकवतात. त्यामुळे त्यांची पत्नी सोनाली ही आरोपीकडे राहत नाही.
त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होतात, असा राहुल शिंदे याचा गैरसमज झाला. त्याचा राग मनात धरून तो कात्रज येथे आला होता. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. घरासमोरचा फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी राहुल शिंदे याला ताब्यात घेतले असून, पोलिस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.