

Baramati News: गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कॅशलेसचा वापर वाढल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एटीएम मशिनमध्ये सहसा नागरिकांची गर्दी दिसून येत नाही.
अनेक जण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, ऑनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहेत. गुगल पे, पेटीएमसह अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने एटीएममध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बदलत्या काळानुसार नागरिक झपाट्याने विकसित होणार्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यामुळे शहरासह गावखेड्यांमध्येही ऑनलाइन व्यवहार करण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. लहान-मोठी खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला रोकड न देता वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन भरणा केला जात आहे.
मोबाइलच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी भीम अॅप, गुगल पे, पेटीएम, फोन पे, व्हॉटसअॅप पे यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी हे वेगवेगळे अॅप डाऊनलोड करून घेतले आहेत. यूपीआयअंतर्गत येणार्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या खुबीने केला जात आहे. मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट करणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. पैसे हरवण्याची भीती नसते, शिवाय खिसेकापूंचीही भीती राहत नाही.
ऑनलाइन व्यवहारांमुळे बँकेतून रोकड काढणार्यांची संख्या रोडावली असली, तरी याचा सर्वाधिक परिणाम एटीएमवर झाला आहे. शहरातील सर्वच एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आता कमी होऊ लागली आहे. एकेकाळी रोकड काढण्यासाठी ग्राहकांनी गजबजलेल्या एटीएममध्ये सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एटीएम किंवा बँकेत जाऊन वेळेचा अपव्यय करण्याची इच्छा नागरिकांमध्ये राहिलेली नाही. ज्या एटीएममधून रोकड काढणार्यांची संख्या घटली, अशा ठिकाणचे एटीएम बंद होऊ लागली आहेत. 1 रुपयापासून काही हजारो रुपयांपर्यंत व्यवहार ऑनलाइन होत असल्याने बाजारामध्ये रोखीचे व्यवहार कमी होत आहेत तसेच रोख रक्कमही जवळ ठेवली जात नाही.