

वर्धा : भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार नदी प्रकल्पासाठी मी ७ वेळा विधानसभेत प्रश्न उचलला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही घरातच तिकीट मिळते. घराणेशाहीवर टीका करताना काँग्रसने ७५ वर्षात ग्रामीण भागाच्या देशाच्या विकासाच्या मुद्यांना प्राधान्यच दिले नाही, अशीही टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथील आठवडी बाजार चौकात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी माजी खासदार रामदास तडस, आर्वीचे आमदार दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सुधीर दिवे, सरिता गाखरे, संदीप काळे आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रस्ते आता छान झालेत. पुढील पाच वर्षांत विदर्भातून ५० लाख लिटर दूध निर्माण करण्याचा निर्धार आहे. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्याकडे ५ गायी असल्या पाहिजे आणि प्रत्येक गायीने २० लिटर दूध दिले पाहिजे, असे स्वप्न आहे. ठिकठिकाणी ‘काऊ फार्म’ तयार करायचे आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी येत्या तीन वर्षात ५ लाख लिटर दूध निर्माण झालं पाहिजे. शेतकर्यांनी क्रॉप पॅटर्न बदलावा लागेल. शेतकरी अन्नदाता सोबतच आता ऊर्जादाता आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणालेत. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.