

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा एक महिना अगोदर निघणार आहे. त्यामुळे पालखी मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदा 10 ते 18 जूनदरम्यान संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते निरामार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. 11 ते 24 जून या काळात संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू ते सराटी, ता. इंदापूर या मार्गावरून मार्गस्थ होईल.
या दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होतील, असा अंदाज प्रशासनाला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली जाणार असून, त्यासंदर्भात जिल्हा परिषदेने अधिकारी व कर्मचार्यांसाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. पालखी मार्गावरील पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, याची तपासणी करून घ्यावी. पालखी आगमनाच्या सात दिवसांपूर्वी पाणी शुद्धीकरण करून घ्यावे. तसेच पालखी सोहळ्यात राज्यभरातून पाण्याचे टँकर येतात
. त्यांना शुद्ध पाणीपुरवठा होईल, याची खबरदारी घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्सची तपासणी करून हॉटेलचालकांना सूचना द्या. प्रत्यक्ष पाहाणी करा, पालखी मार्गावरील गावे आणि मुक्कामाची गावांमधील पाणी साठलेली ठिकाणे, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, कचरा, टायर यासह परिसर स्वच्छ करून घ्या, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पालखी सोहळ्यात फिरत्या रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. त्यात पुरेसा औषधसाठा, कोरोना चाचणी कीट, मास्क, सॅनिटायझर तसेच इतर साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.