Ashadhi Wari | संतांच्या पालख्या शहरात

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत
Devotees taking blessings of the footwear of Saint Dnyaneshwar Maharaj
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेताना भाविकपुढारी

पुणे : भक्तीत तल्लीन झालेले वारकरी... पावसाच्या सरी अंगावर झेलत वारीचा अनुभव घेणारे पुणेकर आणि सर्वत्र दुमदुमलेला विठुनामाचा गजर...अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यात आगमन झाले. हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी भक्तीचा सागर लोटला. श्रीमाउलींची पालखी पुण्याच्या वेशीवर येताच वरुणराजाने स्वागत केले. वारकर्‍यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती. भरपावसातही ‘माउली माउली’चा गजर करीत ते पायी चालत होते. पालखीच्या आगमनाने सगळीकडे आनंद बहरला.

पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सकाळी आळंदी येथून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखीतील प्रत्येक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी पालखी मार्गावर पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. दुपारी दोननंतर वारकरी शहरात यायला सुरुवात झाली आणि पुणेकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. वारकरी टाळ - मृदंगांच्या गजरात अभंगांच्या तालावर आनंदाने नाचत-डोलत होते. दरवर्षाीप्रमाणे पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली.

Devotees taking blessings of the footwear of Saint Dnyaneshwar Maharaj
Ashadhi Wari 2024| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा

वारकरी आणि पुणेकर भक्तिरंगात न्हाहले

संगमवाडी येथून पालखी सोहळा यंदा उशिराने रात्री पावणेआठच्या सुमारास वाकडेवाडी चौकात पोहोचला. या वेळी पाऊसही बरसला, पण, पावसात चिंब भिजत वारकरी आणि पुणेकर भक्तिरंगात न्हाऊन गेले. पालखी रथावर फुलांची उधळण करण्यात आली. विविधरंगी फुलांनी सजविलेला रथ पुणेकरांच्या दृष्टिपथास पडला आणि प्रत्येकाचे चेहरे आनंदाने फुलले. संत श्रीज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि रथातील पादुका दिसताच भाविक कृतकृत्य झाले.

पुण्यात वारकऱ्यांचे स्वागत

वाकडेवाडी चौकातून पालखी सोहळा फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर आला. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. प्रत्येकाने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात हा क्षण बंदिस्त केला. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील संत श्रीज्ञानेश्वर महाराज पादुका चौक येथे मंदिरामध्ये आरती करण्यात आली. संपूर्ण रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

या रस्त्यावर ठिकठिकाणी वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले होते. येथून पालखी सोहळा खंडुजीबाबा चौक, टिळक चौक आणि नंतर लक्ष्मी रस्त्यावर पोहचला. या वेळी पालखीसोबत आलेले वारकरी आपापल्या मुक्कामाच्या दिशेने जात होते. संत श्रीज्ञानेश्वर महाराज यांची पालखी रात्री साडेदहाच्या सुमारास भवानी पेठेतील पालखी श्रीविठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी पोहोचली. पालखी मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजन करून स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मंदिरात पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली.

कळस, विश्रांतवाडी, प्रतीकनगर परिसरात अलोट गर्दी

महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी माउलींच्या पादुकांना हार व श्रीफळ अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यंदा सुमारे दीड तास उशिराने पालखी म्हस्के वस्तीत पोहोचली. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी म्हस्के वस्ती येथे माउलींच्या पालखीचे स्वागत केले. वारकर्‍यांनी आणि नागरिकांनी एकच जयघोष केला. त्यानंतर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी काही अंतरासाठी रथाचे सारथ्य केले.

स्वागतादरम्यान गर्दीचे नियोजन न झाल्याने व महापालिका स्वागत कक्षाजवळ पालखी रथ अवघा पंधरा सेकंदच थांबल्याने धक्काबुक्की झाली. दुपारी साडेतीन वाजता फुलेनगर येथील आदर्श इंदिरानगर श्रीदत्त मंदिर येथे पालखी विसाव्यासाठी थांबली. या वेळी आरती करण्यात आली. विसाव्यानंतर पावणेपाच वाजता पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. म्हस्के वस्ती ते विश्रांतवाडी हे सुमारे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पालखीला एक तास वेळ लागला. म्हस्के वस्ती, कळस, विश्रांतवाडी, प्रतीकनगर परिसरात भाविकांनी माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news