

भवानीनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूवरून पंढरपूरकडे लवकरच प्रस्थान होत आहे. पालखी मार्गावरील झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदा वारकर्यांना रखरखत्या उन्हात वारी करावी लागणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्गावर 100 वर्षांपूर्वीची जुनी झाडे होती. परंतु, मार्गाचे रुंदीकरण करतान ती तोडली. परिणामी, वारकर्यांना वारी करताना यावर्षापासून प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू येथून 10 जूनला प्रस्थान आहे. पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी झाडे होती. झाडांच्या मोठ्या प्रमाणावर पडणार्या सावलीत वारकरी विसावा घेत होते. परंतु, गेल्या वर्षापासून मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या सावली राहिलेली नाही. वारकर्यांना पूर्णपणे उन्हात पालखी मार्गावर चालावे लागणार आहे.
पालखी मार्गाचे काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. परंतु, या झाडांची सावली निर्माण होण्यासाठी किमान दहा वर्षे लागण्याची शक्यता आहे. पालखी मार्गावरील झाडांची कत्तल करण्यापेक्षा अनेक झाडांचे रोपण करता आले असते, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. पालखी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. उड्डाणपुलांच्या कामांच्या ठिकाणी रस्त्याला वळणे दिलेली आहेत. अशा ठिकाणांवरून जाताना वारकर्यांना कसरत करावी लागणार आहे.