

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेकडून सध्या पालखी सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. जून महिन्यात होणार्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कामांच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी (दि. 25) घेणार आहेत.
आरोग्य विभागाकडून पालखी मार्गावरील पाणी तपासणी, हॉटेल तपासणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वारकर्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी उपचारदेखील केले जाणार आहेत. याशिवाय पाणी व स्वच्छता विभागाकडून पालखी मार्गावर फिरती शौचालये पुरविली जाणार आहेत. दोन प्रमुख पालखी सोहळ्यांबरोबरच श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी पंढरपूरपर्यंत आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी फिरती शौचालये पुरविली जाणार आहेत. याशिवाय सोहळ्यात स्वच्छता कर्मचार्यांकडून स्वच्छता देखील केली जाणार आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय टँकरच्या पाण्याची तसेच मार्गावरील जलस्रोतांचे शुद्धीकरण करण्याचे जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे, याचा पालकमंत्र्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकार्यांसह जिल्हा परिषद प्रशासन, पोलिस व पालखी सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.