

पुणे: ‘आशाताई मोठ्या गायिका होत्या. पण, त्यांनी कधीही हे मोठेपण जाणवू दिले नाही. सतत हसतमुख राहणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व दिलखुलास होते. त्या बहुआयामी गायिका होत्या. प्रत्येकाशी त्यांनी आपुलकीचे नाते जोडले. संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. आशाताईंच्या जाण्याने कलाविश्वातील एक चमकता तारा निखळला आहे,’ अशा शब्दांत कला-सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनी आशा भोसले यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी (दि. 12) निधन झाले. संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे होते. त्यांचा सहवास लाभला, हेच आमचे भाग्य आहे, अशा शब्दांनी कलाकारांनी आशाताईंसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला.
माझे गुरू पं. बिरजू महाराज यांच्यामुळे माझी अनेकवेळा आशाताईंशी भेट झाली. एकदा बिरजू महाराज यांचे कथक नृत्य वर्कशॉप मुंबईला नेहरू सेंटरमध्ये होते. आम्ही नृत्य करीत होतो. तेवढ्यात आशाताई महाराजजींना भेटायला आल्या आणि थेट रंगमंचावर आल्या. आशाताई स्वत: महाराजजींबरोबर नृत्य करू लागल्या. दोघांचेही एवढे सुंदर नृत्य पाहून मी भारावून गेलो. हा खरोखरच दुर्मीळ क्षण होता. आशाताईंच्या जाण्याने कलाविश्वातील एक चमचमता तारा निखळला आहे.
पं. डॉ. नंदकिशोर कपोते, ज्येष्ठ नृत्यगुरू
आशा भोसले यांच्याशी पं. भीमसेन जोशी आणि कुटुंबीय यांचा अनेक दशकांचा परिचय होता, स्नेह होता. आशाताईंनी माझ्या वडिलांसोबत एक दोन ठिकाणी पार्श्वगायनही केले होते. ते एकत्र एक अल्बमदेखील करणार होते, पण काही कारणास्तव ते पुढे शक्य झाले नाही. महान गायिकेला आमच्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
आशाताईंच्या स्वरांनी गेल्या सात दशकांपासून केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर अवघ्या जगाच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीने सुरांना नवे परिमाण दिले आणि शब्दांना जिवंतपणा प्राप्त करून दिला. मराठी मातीतील स्वरांना त्यांनी जागतिक स्तरावर जी प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याबद्दल प्रत्येक मराठी मन तुमचे कायम ऋणी राहील.
कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष,नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा
गेली तीस वर्षे विविध कलावंत आणि संगीतकारांना भेटलो आहे. आशाताई अत्यंत स्पष्टोक्त्या होत्या. एका गीत कार्यक्रमात त्यांनी गायन सादर केल्यानंतर त्यांनी मला विचारले, “कसं झालं माझं गाणं?” त्यावर “छान झालं” असे उत्तर दिल्यावर त्या म्हणाल्या, मी चुकीचे गायले आणि तू चांगले कसे म्हणतोस? या प्रसंगातून त्यांच्या स्वतःच्या कलेविषयीच्या प्रामाणिकतेची जाणीव होते. लता मंगेशकर यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. तो त्यांचा पुण्यातील शेवटचा कार्यक्रम होता.
सुनील महाजन, अध्यक्ष, संवाद, पुणे
आशाताईंना भेटण्याची संधी मला एका कार्यक्रमात मिळाली. त्या वेळी त्यांच्यासमोर गायनाची संधीही मिळाली. त्यांनी माझ्या गायिकेचे कौतुक केले. त्यांच्यासमोर मी गाऊ शकले, हे माझे भाग्य आहे. आशाताई बहुआयामी गायिका होत्या. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
मंजूषा पाटील, गायिका
लतादीदी आणि आशाताई या खूप मोठ्या गायिका होत्या. आशाताईंच्या जाण्याने आपल्या घरातली व्यक्ती, मनातला आवाज हरवला आहे, असे वाटत आहे. आशाताईंशिवाय भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील संगीतविश्वाची कल्पनाही होऊ शकत नाही. त्यांच्यासोबत रंगमंचावर उभे राहणेच हेच माझे भाग्य होते. लतादीदींच्या नसण्यातून सावरत असतानाच हा दुसरा मोठा धक्का मिळालेला आहे. आकाशातले चांदणे निघून गेले आहे आणि फक्त अंधार उरलेला आहे, असे वाटत आहे.
डॉ. सलील कुलकर्णी, संगीतकार-गायक
आशाताईंच्या जाण्याने संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आशाताईंचे आम्हा सर्व गायकांवर खूप उपकार आहेत. नाट्यसंगीत असेल, चित्रपट गीते असतील भक्तिगीते असतील, गायकाने कसे गायला पाहिजे, हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. आशाताईंबरोबर मला थोडासा का होईना वेळ घालवता आला, हे मी माझे सुदैव समजतो. त्यांच्या हस्ते मला एक पुरस्कारही मिळाला होता, त्या रूपात त्यांचे आशीर्वादच जणू मिळाले, असे मला वाटते. माझ्या आजोबांकडे त्या नाट्यगीते शिकायलाही आल्या होत्या, तेव्हाची आठवण कायम सोबत राहील.
राहुल देशपांडे, गायक
मला आशाताईंचा सहवास मिळाला. त्यांना अनेकदा भेटता आले, त्यांचे आशीर्वाद मिळाले. त्यांनी गायनासंदर्भातील काही कानमंत्रही दिले. रियाज कधीच सोडू नको, रियाजाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही, असे त्या सांगत. मोठी गायिका व्हायचे असेल तर दीदींच्या गाण्यांचा अभ्यास कर, असे त्यांनी सांगितले. त्यातून त्यांचे मोठेपणा दिसून येते. आशा हे त्यांचे नाव त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सार्थ ठरवले आहे. आम्हा स्त्री गायिकांसमोर त्या मोठे आदर्श आहेत.
सावनी रवींद्र, गायिका
काही व्यक्ती अशा असतात की, आपण त्यांना इतक्या उंच स्थानावर ठेवतो की, त्या आपल्यासाठी अमर, देवासारख्या वाटू लागतात. आशाताई माझ्यासाठी नेहमीच अशाच व्यक्तींपैकी एक राहिल्या आहेत. माझं त्यांच्याशी वैयक्तिक नातं होतं. त्या माझ्या गुरुजींची बहीण असल्यामुळे मी त्यांना ‘आत्या’ म्हणायचो. एका रिॲलिटी शोमध्ये त्या परीक्षक म्हणून आल्या होत्या, जिथे मीही परीक्षक होतो. तिथे मला त्यांच्यातील दिग्गज कलाकारामागील माणूसपण पाहायला मिळाले.
महेश काळे, गायक
पं. हृदयनाथ मंगेशकर यांना मी तीस वर्षे कार्यक्रमात तबलासाथ करत आहे. त्यानिमित्ताने कधी कधी आशाताईंशी भेट व्हायची. दिलखुलास, जिंदादिल व्यक्तिमत्त्व आणि परिस्थितीशी लढणाऱ्या म्हणजे आशाताई हेच समीकरण आहे. साथीदारांची आपुलकीने विचारपूस हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते.
राजेंद्र दूरकर, तबलावादक
एकदा एका कार्यक्रमासाठी मला त्यांच्यासोबत जाण्याचे भाग्य लाभले. आशाताई छान गप्पा मारत होत्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, रायरीकर समजा माझा आवाज गेला आणि मी गाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर मी गप्प बसणार नाही. मी हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन छान छान पदार्थ बनवून करून खवय्यांना खाऊ घालीन... मी म्हणालो, ‘तुमचा आवाज चिरतरुण आहे, त्यामुळे अशी वेळ येणारच नाही...’ आशाताई सदैव आपल्यात राहतील.
शिरीष रायरीकर, मनोरंजन, पुणे