थंडीमुळे फ्लॉवर खातोय भाव ; टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, घेवडा, शेवगा झाला स्वस्त

थंडीमुळे फ्लॉवर खातोय भाव ;  टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, घेवडा, शेवगा झाला स्वस्त

पुणे : थंडीचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम फ्लॉवरच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फ्लॉवरची आवक रोडावली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी (दि. 7) घाऊक बाजारात फ्लॉवरच्या दहा किलोला 240 ते 250 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री सुरू होती.

ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरण तयार होऊन उत्पादनात वाढ झाल्याने तरकारी विभागात टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, घेवडा व शेवग्याची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. तर, बहुतांश फळभाज्यांची आवक जावक कायम राहिल्याने फळभाज्यांचे भाव टिकून होते, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश व गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 10 ते 12 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून 18 ते 22 ट्रक मटार, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो पावटा, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 7 ते 8 टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 650 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 14 ते 15 हजार क्रेट, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, दुधी भोपळा 10 ते 12 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेप्मो, पावटा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 100 ते 110 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 80 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news