

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीकडून पुरविण्यात येणार्या 'पुष्पक' सेवेसाठी सध्या एकच बस शहरात धावत असल्याने सर्वसामान्य पुणेकरांचे हाल होत आहेत. या सेवेत वाढ करावी, अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात पीएमपीकडून मृतदेहांची घर ते स्मशानभूमी अशी वाहतूक करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून 'पुष्पक' बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला पुणे शहरात आता फक्त एकच 'पुष्पक' बस धावत आहे. यामुळे अनेकांना ही बस उपलब्ध होत नसून, नागरिकांना अन्य रुग्णवाहिकांसाठी अधिकचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. याकडे पीएमपी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
पीएमपीची 'पुष्पक' बससेवा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन्हीकडे आहे. पूर्वी पुण्यात 4 बसची आणि पिंपरीत एका बसद्वारे ही सेवा पुरविली जायची. मात्र, आता पुण्यातील 3 बस प्रशासनाने बंद केल्या असून, पुण्यात फक्त एकाच बसद्वारे सेवा पुरविली जात आहे, तर पिंपरीमध्ये एकाच बसद्वारे सेवा पुरविली जात आहे.
पूर्वी पुण्यात 4 गाड्या 'पुष्पक' सेवेसाठी होत्या. त्यातील सध्या एक गाडी सेवा पुरवत आहे. उर्वरित 3 गाड्या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कन्व्हर्ट करून डेपोंना देण्यात आल्या आहेत. त्या बसगाड्यांद्वारे प्रवासी सेवा पुरविण्यात येत आहे.
– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएलसर्वसामान्यांकरिता 'पुष्पक' बससेवा ही फायद्याची आणि परवडणारी आहे. फक्त एकच बस सुरू ठेवणे, हे चुकीचे असून, या सेवेत पूर्वीपेक्षा वाढ करण्यात यावी.
– दीपक मानकर,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
सर्वसामान्यांना परवडणारे 'पुष्पक'चे दर
एकेरी सेवेसाठी – 300 रुपये
दुहेरी सेवेसाठी – 600 रुपये
(किलोमीटरवरून दर पकडण्यात येत नाहीत, अंतर जास्त असो किंवा कमी, दर सारखेच असणार.)
'पुष्पक' बससाठी संपर्क इथे करा
पीएमपीची 'पुष्पक' बससेवा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन्हीकडे आहे. यात पुण्यामध्ये गाडी बुक करायची असेल तर 020-24503211/24503212 या क्रमांकांवर संपर्क करावा; तर पिंपरी-चिंचवड शहराकरिता गाडी बुक करण्यासाठी 020-27422001/27422224 या क्रमांकांवर संपर्क करावा. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे.