

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : बदलत्या हवामानाचा मोठा फटका वन्यजीवांना बसला आहे. भीषण वणवे व उन्हाची तीव—ता वाढल्याने वन्यजीवांची खाद्य, पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे वनविभागाने सिंहगड किल्ल्याच्या जंगलापासून पाचगाव पर्वती, पानशेत वरसगाव धरण भागांसह राजगड, तोरणा खोर्यातील जंगलात वनतळे, पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यावर ससे, हरिण, रानडुक्कर मोर अशा वन्यजीवांची तहान भागत आहे.
कडक उन्हामुळे बहुतेक नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांसाठी वनविभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. असे असले खाद्य पाण्यासाठी ससे, हरिण, रानडुक्कर, मोर, असे वन्यजीव नद्या, धरणाच्या पाणवठ्यावर येत आहेत. पर्वती ते सिंहगड किल्ल्याच्या परिसरात आंबीपर्यंत जवळपास तीन हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. तर, राजगड, तोरणा गडाच्या डोंगर, पानशेत खोर्यात जवळपास दहा हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे.
पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ म्हणाले, की वन्यजीवांचे उन्हाळ्यात पाण्याअभावी हाल होऊ नये यासाठी पाणवठ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या घोल, गारजाईवाडी, टेकपोळे, खाणू चांदर, पोळे दापसरे भागातील डोंगर कड्यातील झरे, टाके, अशा नैसर्गिक पाणवठ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. वन्यजीवांसाठी पानशेत-वरसगाव धरण भागातील जंगलात 20 वनतळे तयार केली आहेत. एक वनतळे एक हजार लिटर क्षमतेचे आहे. या तळ्यात टँकरने पाणी टाकले जात आहे.
पानशेत वनविभागाचे वनरक्षक बंडू खरात म्हणाले, की आंबेड, वडघर, मोसे बुद्रुक, वरसगाव आदी ठिकाणच्या वनतळ्यांमुळे वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना पाणी मिळत आहे. या भागात वन्यजीवांची संख्या अधिक आहे.
पर्वती, भांबुर्डा, सिंहगड किल्ल्याच्या परिसरात वन्यजीवांसाठी 17 वनतळी तयार करण्यात आली आहेत. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात वन्यजीवांचा अधिवास क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे येथील जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांची साफसफाई करण्यात आली आहे. छोटे पाणवठे तयार केले आहेत.
– प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे वनविभाग