

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर 'स्क्रॅप किंग को टपकाना, 302 फिक्स', असे स्टेट्स ठेवणार्या शिक्रापूर येथील दर्शन शिवाजी खैरनार (वय 23, रा. करंजेनगर, शिक्रापूर) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील जुन्या टोलनाक्यावर एक युवक हातात तलवार घेऊन नागरिकांवर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सहायक फौजदार जे. एस. पानसरे, पोलिस हवालदार ए. ए. दांडगे, एस. एस. होनमाने, जे. व्ही. देवकर व निखिल रावडे यांचे पथक नेमले व जुन्या टोलनाक्याजवळ कारवाईसाठी पाठविले. त्या वेळी खैरनार हा 32 इंची तलवारीसह आढळून आल्याने त्याला तिथेच ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, सोशल मीडियावरील स्टेटसमध्ये खैरनार याने 'एकही मकसद, पुणे नगर रोडके इंडस्ट्रीयल स्क्रॅप किंग को टपकाना, 302 फिक्स' असे लिहून त्याने त्याखाली शिक्रापुरातील अॅलिकॉन व एन्काई या दोन कंपन्यांची नावे लिहिली होती. हे स्टेट्स शिक्रापूर परिसरात व्हायरल झाले होते. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रारी गेल्याने त्याला अटक करण्यात आली. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.
शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीतील औद्योगिक परिसरात शांतता राखण्यास प्रथम प्राधान्य असून, कुणीही बेकायदा शस्त्रे बाळगल्यास सहन करणार नाही. याबाबत आता प्रत्येक गाव, वस्त्या आणि नगरांमधील बेकायदा शस्त्रे बाळगणार्यांची माहिती घेत आहोत. गरज पडल्यास मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहोत.