

निमोणे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील निमोणे येथील पिंपळवाडी व चिंचणी नदीपात्रातून निमोणे वाळू डेपो ठेकेदार मनमानी व चुकीच्या पद्धतीने अटी व शर्तींचे उल्लंघन करून वाळू उपसा करत असल्याने शिरूरच्या निवासी नायब तहसीलदार स्नेहल गिरीगोसावी यांनी पाहणी करून पंचनामा केला. ठेकेदार मनमानी पद्धतीने दिवसा व रात्रीही उपसा करून वाहतूक करत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. खराब रस्त्यामुळे ऊसतोडी थांबल्या व इतर शेतमालाच्या वाहतुकीस अडथळा आला. चार महिन्यांपासून नदी पात्राची चाळण करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला आहे.
नायब तहसीलदारांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी वाळू ठेकेदाराने नदीपात्रातून ट्रॅक्टर व सहा टायर गाडीनेच वाहतुकीस परवानगी असताना दहा टायर गाडीचा वापर केल्याचे आढळून आले. नायब तहसीलदार स्नेहल गिरीगोसावी, शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सरपंच संजय काळे व गावकामगार तलाठी रवींद्र जाधव यांनी केलेल्या पंचानाम्यावरून असे निदर्शनास आले की, नियम व अटींचे उल्लंघन केल्यामुळे निमोणे वाळू डेपो बंद करण्यास पात्र ठरतो. या संदर्भात योग्य ते पुरावे द्यायला ग्रामस्थ तयार आहेत. तरी योग्य न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे सांगितले.
स्थानिकांना आजपर्यंत एकही ब्रास वाळू ठेकेदाराने दिली नाही. वाळू मागणीची ऑनलाइन नोंदणी ठेकेदारांकडे होत नाही, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. सेतू केंद्रात नोंदणी करा, असे ठेकेदार सांगतो पण सेतू केंद्रांत गेले तर तिथे पण नोंद होत नाही आणि झालीच तर वाळू साठा शिल्लक नाही असे दाखवले जाते.