पुणे : मीटरनुसार पाणी बिलास मंजुरी द्या : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालिकेची मागणी

पुणे : मीटरनुसार पाणी बिलास मंजुरी द्या : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालिकेची मागणी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अनेक नागरिकांकडून दरडोई 150 लिटरपेक्षा अधिक पाणी वापर केला जात आहे. हा वापर कमी करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत बसविलेल्या मीटरनुसार पाण्याचे बिल आकारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. महापालिकेने मीटरद्वारे बिल आकारणीचा प्रस्ताव ठेवल्याने निवडणुकांच्या तोंडावर भाजपची कोंडी होणार आहे. खडकवासला धरणातील पाण्याच्या वाटपावरून जलसंपदा विभाग आणि महापालिकेत वाद सुरू आहेत.

महापालिकेला वर्षभरासाठी 12.46 टीएमसी पाणी साठा मंजूर असताना महापालिका जादा पाणी वापरत आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामीण भागातील आमदार वारंवार करतात. यावरून मागील आठवड्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतही वाद झाले. त्यामुळे या पाणीगळतीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीस विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, माजी मंत्री दत्ता भरणे, आमदार चेतन तुपे, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, राहुल कुल, माधुरी मिसाळ यांच्यासह महापालिकेचे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापालिकेकडून शहरासाठी 20.50 टीएमसी पाणी आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली.

त्यानंतरही आमदार राहुल कुल आणि जलसंपदा विभागाकडून पालिका शहरासाठी जादा पाणी वापरत असून, मंजूर कोट्याएवढे पाणी कधी वापरणार, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, यावेळी पालिकेकडून शहरात पाणी मीटर बसविले असून, दिवसाला दीडशे लिटर पाणी वापरणे आवश्यक असताना अनेक जण 2 हजार लिटरपर्यंत पाणी वापरतात. हा पाणी वापर कमी करण्यासाठी मीटरनुसार बिल आकारणीला मान्यता द्यावी, अशी भूमिका घेतली.

पालकमंत्र्यांची सावध भूमिका
महापालिकेने मीटरद्वारे पाणी बिल आकारणीची मागणी करताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावध भूमिका घेतली. 'या विषयावर नंतर बघू, आधी गळती कमी करण्यासाठी तातडीने समान पाणी योजनेचे काम पूर्ण करावे', अशी सूचना केली. मात्र, एका बाजूला शहराचा पाणी वापर जास्त असल्याची तक्रार भाजप आमदारांकडून होत असताना आणि दुसर्‍या बाजूला पाणी वापर कमी करायचा असल्यास महापालिकेने पुणेकरांवर मीटरद्वारे बिल आकारणीचा प्रस्ताव ठेवल्याने ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपची कोंडी होणार आहे.

पाणीपुरवठ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण करा
मंजूर पाण्याचा कोटा, पाण्याचे अंदाजपत्रक, जलशुद्धीकरण केंद्रनिहाय झोन, मीटर बसविण्याच्या कामाची प्रगती व नियोजन याबाबतचा आढावा घेतला, तसेच समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांची कामे सप्टेंबर 2023 पर्यंत, तर पाइपलाइनचे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे, सोसायट्यांमधील पाणी गळतीची कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत, बांधकामाला, बागेला शुद्ध पाणी वापरले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news