

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या वित्तीय समितीच्या बैठकीत सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यावर भर देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील नऊ महिने पूर्ण झाले असून, वर्षातील शेवटची तिमाही बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदींवर तसेच विविध विभागांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांवर मंगळवारी वित्तीय समितीच्या बैठकीत चर्चा झाली.
याविषयी महापालिक आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी माहीती दिली. यापूर्वी देखभाल व दुरुस्तीच्या पन्नास टक्के खर्चाला मान्यता दिली गेली होती. या खर्चाचा आढावा घेऊन पुढील तीन महीन्यात करावयाच्या कामासंदर्भात आयुक्त भोसले यांनी विभागप्रमुखांना कामांचे प्राधान्य ठरवून त्याचे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. याविषयावर या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय आरोग्य, पथ, प्रकल्प, शाळा, पाणीपुरवठा, माहिती तंत्रज्ञान, पीएम आवास योजना, उद्यान, मेट्रो, जायका आदींवर चर्चा झाली.
महसुली कामांसाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांची मान्यता
पंतप्रधान आवास योजनेसाठी २५ कोटी रुपये मंजूर
समान पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे १२५ कोटी रुपये मंजूर
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विविध कामांसाठी चारशे कोटी रुपये मंजूर
रस्त्यांच्या कामासाठी १७० कोटी रुपये मंजूर
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या 'झू मास्टर प्लान'साठी २५ कोटी रुपये मंजूर
परिमंडळ कार्यालय स्तरावर पाच ठिकाणी डॉग शेल्टर उभारण्यासाठी दहा कोटी रुपये
प्रकल्प विभागाच्या विविध कामांसाठी ३०० कोटी रुपये मंजूर
जायका प्रकल्पासाठी ३९४ कोटी रुपये मंजूर महापालिकेच्या शाळांच्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती आणि सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी