पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत मुदत संपणार्या, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर पडल्याने प्रशासकांची नेमणूक करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. प्रशासक म्हणून ग्रामसेवकपदापेक्षा वरिष्ठ कर्मचारी प्रशासक म्हणून नेमण्याची तरतूद आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958-59; तसेच ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 मधील तरतुदीप्रमाणे सरपंचपदाचे अधिकार मिळणार आहेत. मात्र, प्रशासकपदी नियुक्त केलेल्यांकडून कामात हयगय किंवा गैरवर्तणूक झाल्यास प्रशासकांना पदावरून काढले जाईल, असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या…
शिरूर आणि खेड प्रत्येकी एक, पुरंदर दोन, वेल्हे आणि हवेली प्रत्येकी चार, आंबेगाव नऊ, भोर दहा, मुळशी आणि मावळ प्रत्येकी 11, बारामती 15, जुन्नर 19.