Pune News : आता पुण्यात कंटेनरमध्ये ’आपला दवाखाना’

Pune News : आता पुण्यात कंटेनरमध्ये ’आपला दवाखाना’
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील व समाविष्ट गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडून 58 ठिकाणी 'आपला दवाखाना' आणि 96 ठिकाणी 'आरोग्यवर्धिनी केंद्र' सुरू केले जाणार आहेत. लवकरच 29 'आरोग्यवर्धिनी केंद्र' सुरू करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी कंटेनरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय, नायडू रुग्णालयासह 54 दवाखाने आणि 19 प्रसूतिगृहे कार्यान्वित आहेत. मात्र, उपनगरांमधील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी दर वेळी शहरात येणे शक्य नसते. अशा वेळी आरोग्य सुविधा निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत 'आपला दवाखाना' व 'आरोग्यवर्धिनी केंद्र' सुरू करण्यात येणार आहेत. एका केंद्रात एक डॉक्टर, दोन नर्स, एक ड्रेसर आणि एक फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
शहरातील 30 हजार लोकसंख्येच्या मागे 1 'आपला दवाखाना' यानुसार 58 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्यात येणार आहे. तसेच, 125 'आरोग्यवर्धिनी केंद्र' सुरू केली जाणार आहेत. यातील 29 'आरोग्यवर्धिनी केंद्रांची' तयारी पूर्ण झाली असून, ही केंद्रे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. उर्वरित 96 पैकी 25 ठिकाणच्या जागा ताब्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जागा मिळणार नाहीत, तेथे कंटेनरच्या माध्यमातून सेवा दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
'आरोग्यवर्धिनी'ची 29 केंद्र लवकर सुरू करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यातील 96 पैकी 25 आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित ठिकाणी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– विकास ढाकणे, 
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news