

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बनावट बँक गॅरंटी महापालिकेला सादर करून फसवणूक केल्या प्रकरणात जनार्दन रामय्या हेगडे (रा. 12, संगिता निवास, किसान नगर, वागळे इस्टेट, ठाणे) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश डी. पी.रागीट यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.
15 सप्टेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 दरम्यान हा प्रकार घडला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील अ व ब क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर यांची दैनंदिन सफाई तीन वर्षासाठी निवीदा मागविण्यात आली होती. त्यावेळी, आरोपी व त्याच्या साथीदारांनी भारतीय स्टेट बँक मुंबई शाखेच्या दोन बनावट बँक गॅरंटी अनक्रमे रक्कम 3 कोटी 46 लाख 71 हजार व 3 कोटी 44 लाख रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेला सादर केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याबाबत, 55 वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी हेगडे याने न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्याची व्याप्ती मोठी आहे. यापुर्वी अटक करण्यात आलेल्या रमेश मोरे याच्या बँकेच्या स्टेटमेंटची तपासणी केली असता हेगडे यासोबत 74 लाख 40 हजारांचा व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. मोरे याच्या मोबाईलमध्ये हेगडे सोबत बनावट बँक गॅरंटीबाबत बोलणे झाल्याचे दिसून येत असून त्याबाबतचा तपास करायचा असल्याने हेगडे याचा अटकपुर्व जामीन फेटाळावा अशी विनंती अगरवाल यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य केली.