पुणे : प्रतिजैविकांचा अतिवापर ही भविष्यातील महामारी जाणकारांचे मत

पुणे : प्रतिजैविकांचा अतिवापर ही भविष्यातील महामारी जाणकारांचे मत
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वारंवार प्रतिजैविके घेतल्याने जिवाणूंची प्रतिकारशक्ती वाढते आणि औषधांचा परिणाम कमी होत जातो. प्रतिजैविकांचे यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे तसेच हृदयावर विपरित आणि दीर्घकालीन परिणाम होतात. याबाबत ठोस पावले उचलली न गेल्यास प्रतिजैविकांचा अतिवापर हा भविष्यातील महामारी ठरेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिजैविकांच्या अतिरेकी वापरामुळे औषधांचा परिणाम नगण्य होत असल्याचा शोधनिबंध नुकताच लॅन्सेट या जगप्रसिध्द वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झाला. यापूर्वी 'फ्रन्टियर इन मायक्रोबायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात संशोधनातूनही शरीराच्या नैसर्गिक सुरक्षाप्रणालीवर प्रतिजैविकांचा परिणाम होत असल्याचे आढळले आहे.

प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशींचे रक्षण करणारे आणि संसर्गाला अटकाव करणारे 'चांगले' जीवाणू नष्ट होतात. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्रतिजैविकांचा शोध लावल्याबद्दल त्यांना 1945 मध्ये नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी 'प्रतिजैविकांचा अतिवापर केल्यास शरीरातील पोषक जिवाणूंचाही नाश होऊ शकतो', हे त्यांनी स्वत: अधोरेखित करून अतिवापराचे दुष्परिणाम सांगितले होते.

प्रतिजैविकांचा वापर सर्वसाधारणपणे बॅक्टेरिया अर्थात जिवाणूंमुळे होणा-या आजारांच्या विरोधात केला जातो. विषाणूजन्य आजारांमध्ये प्रतिजैविकांचा फारसा उपयोग होत नाही. मात्र, कोरोनाकाळात अ‍ॅटिबायोटिक्सचा शरीरावर मारा करण्यात आला. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात, असे मत ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

प्रतिजैविकांविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होणे, ही उत्क्रांतीच आहे. प्रतिजैविकांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केल्यास औषधांचा परिणाम कमी होतो. म्हणून, अतिरेकी वापर टाळणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे घेणेही अपायकारक आहे.

                                                         – डॉ. मिलिंद वाटवे, जैवशास्त्रज्ञ

डॉक्टरांचा अँटिबायोटिक देण्याकडे वाढलेला कल, अतिवापरच्या दुष्परिणामांबाबत असलेली अनभिज्ञता यामुळे धोका वाढत आहे.

                              – डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ

उपाययोजनांची गरज
1. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे न देण्याचा कायदा प्रभावीपणे राबवला जावा.
2. देशपातळीवर अँटिबायोटिक्स रेसिस्टन्सची माहिती घेण्यासाठी यंत्रणा तयार करावी.
3. विक्री झालेली मात्र वापरात न आलेल्या अँटिबायोटिक्सच्या विल्हेवाटीबाबत उपाययोजना करावी.
4. डॉक्टरांमध्ये जनजागृती, प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news