

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यातील बाजार समिती ही शेतकर्यांची अस्मिता आहे. आण्णासाहेब मगर यांनी व शेतकर्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन बाजार समितीची उभारणी केली. याच बाजार समितीत भ्रष्ट लोकांनी हक्काची बाजार समिती लुबाडली. अशा भ्रष्टाचारी लोकांना तालुक्यातील शेतकर्यांनी जागा दाखवावी व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आण्णासाहेब मगर सहकार पॅनेलमधील तरुण व निष्कलंक उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील बोल्हाईमाता मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष पुरस्कृत आण्णासाहेब मगर सहकार पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना आ. पवार बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. या वेळी सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, माधव काळभोर, महादेव कांचन, माणिकराव गोते, शिवदास काळभोर, दिलीप वाल्हेकर, त्रिंबक मोकाशी, भरत जाधव, युगंधर काळभोर, अमित कांचन, पुण्याचे माजी उपमहापौर दिलीप बराटे, सुरेखा भोरडे, भारती शेवाळे, दीपक गावडे आदी मान्यवर तसेच पॅनेलमधील सर्व उमेदवार व तालुक्यातील शेतकरी सभासद व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते
पक्षासाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागे घेतली, त्यांचे धन्यवाद मानतो. बाजार समिती पक्षाच्या हातात आल्यानंतर चेहरामोहरा बदलून टाकू, नवीन तरुण नवखे संचालक द्या, जगात हवेली बाजार समितीचे नाव होईल असा कारभार करू, आण्णासाहेब मगर यांनी दिलेल्या दिशा आम्ही पाळू, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकारातील धोरणाला बळकटी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
हर्षदा वांजळे यांचा राष्ट्रवादी पॅनेलला पाठिंबा
दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला पाठिंबा देऊन सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. पक्षाने आमच्या कुटुंबाला मोठा आधार दिला, राजकीय पुनर्वसन केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले. महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व दिले. आम्हाला काहीही कमी केले नाही, त्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंबीय पक्षासोबत आहे व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे असेही वांजळे यांनी सांगितले.