पारगाव; पुढारी वृत्तसेवा : सततचे ढगाळ हवामान, कडाक्याचे ऊन, याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. पालेभाज्या पिवळ्या पडल्याने पालेभाज्यांच्या खरेदीकडे व्यापार्यांनी पाठ फिरवली आहे. बाजारपेठेत नेऊनही कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने मजुरी तसेच वाहतुकीचे भाडे देखील वसूल होत नाही. यामुळे शेतकर्यांनी पालेभाज्यांच्या उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मेथी, कोथिंबीर, शेपू या पालेभाज्यांची पिके वरचेवर शेतकरी घेतात. यापूर्व काळात सर्वच पालेभाज्यांना बाजारभावाची चांगली साथ मिळाली. या पिकांनी शेतकर्यांना लाखो रुपये मिळवून दिले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सततचे ढगाळ हवामान, कडाक्याचे ऊन, यामुळे पालेभाज्यांच्या पिकांवर विविध रोगांचे सावट पसरले आहे. शेतकर्यांनी औषध फवारणीसाठी देखील मोठा खर्च केला. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
सध्या केवळ चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांनाच बाजारभाव मिळत आहे. सद्य:स्थितीत पालेभाज्या कडाक्याच्या ऊन्हामुळे पिवळ्या पडल्या आहेत. या पालेभाज्यांच्या खरेदीकडे व्यापार्यांनी पाठ फिरवली आहे. येथून नारायणगाव बाजारपेठेत पालेभाज्या विक्रीसाठी शेतकरी नेतात. परंतु, सध्या जुडीला पाच ते सात रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव कमी आहे. या मिळणार्या बाजारभावातून भांडवल तर दूरच; परंतु मजुरी, वाहतूक भाडे देखील वसूल होत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी पालेभाज्यांची काढणी थांबवून त्यामध्ये जनावरे सोडली आहेत.