

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या दूध अनुदान योजना अंमलबजावणीला पंधरवड्याचा कालावधी होऊनही नेमक्या किती जनावरांचे ईअर टॅगिंग झाले आहे, याची माहितीच पशुसंवर्धन विभागाकडून दुग्ध विभागाला उपलब्ध होत नसल्याचे समजते. दूध उत्पादक शेतकर्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड व पशुधनाच्या आधार कार्डशी (ईअर टॅग) संलग्न असल्यावर अनुदान मिळणार आहे. मात्र, हे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याने योजनेतील पहिल्या दहा दिवसांचे अनुदान मिळण्यास विलंब होणार असल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने 5 जानेवारी 2024 च्या निर्णयानुसार राज्यातील सहकारी संघ, खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना दुधासाठी प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब—ुवारी या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.
राज्यात नेमक्या किती जनावरांचे ईअर टॅग पूर्ण झाले, याची आकडेवारी योजनेच्या अंमलबजावणीला पंधरवडा उलटूनही दुग्ध विभागास उपलब्ध झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे विभागात सहकारी संघ 12, मल्टिस्टेट 7 आणि 64 खासगी मिळून एकूण 83 दूध प्रकल्प अनुदानासाठी पात्र ठरल्याची माहिती अधिकार्यांकडून मिळाली.
ईअर टॅगिंग प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद : परिहार
राज्य सरकारच्या योजनेनुसार दूध अनुदान वितरणासाठी आवश्यक असलेल्या जिल्ह्यात पशुपालकांचा आपल्या पशुधनाच्या कानाला 12 अंकी युनिक ईअर टॅगिंग प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 10 जानेवारीपर्यंत 16 हजार 246 पशुधनाची व 3 हजार 371 पशुपालकांची नव्याने नोंदणी केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली. 'भारत पशुधन अॅप'वर जनावर हस्तांतरणाची नोंदणी 7 हजार 634, नोंदीत केलेले बदल 3 हजार 691, पशुपालकांच्या नावात 958 इतक्या बदलाचे कामकाज करण्यात आले आहे. राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये ईअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाइन नोंदणी 'भारत पशुधन पोर्टल'वर करण्यात आली आहे अशाच दुधाळ गायींसाठी शासनाचे अनुदान देय असणार आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांना पशुधनाचे युनिक ईअर टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पशुधनाला वेळीच टॅगिंग होण्यासाठी अतिरिक्त 1 लाख 42 हजार इतका टॅगचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करून देण्यात आलेला आहे.