पिंपरी : आंद्राचे पाणी मार्चमध्ये मिळणार

पिंपरी : आंद्राचे पाणी मार्चमध्ये मिळणार
Published on
Updated on

पिंपरी : शहराला आंद्रा धरणाचे अधिकचे पाणी मिळण्यासाठी मार्च महिना उजाडणार आहे. महापालिकेकडून इंद्रायणी नदीवर निघोजे बंधारा येथून एकूण 100 दशलक्ष लिटर (एमएलडी) इतके पाणी शहरासाठी उचलण्यात येणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत 40 एमएलडी पाणी उचलण्यासाठी आवश्यक वीज यंत्रणेचे कामकाज मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यात 40 एमएलडी पाणी उचलण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये वीज यंत्रणेचे सर्व कामकाज पूर्ण करून 100 एमएलडी पाणी घेतले जाणार आहे.

चिंचवड विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी या निर्णयाबाबत तारीख पे तारीख पडत आली आहे. आता तरी याबाबत निर्णय होऊन ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांना अधिकचे पाणी मिळून त्यांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

शहराला आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे बंधारा ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आला आहे. निघोजे येथील हेडवर्क्सचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, सुरुवातीला 40 एमएलडी इतके पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या वीज यंत्रणा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मार्चमध्ये निघोजे बंधारा येथून इंद्रायणी नदीवरून किमान 40 एमएलडी इतके पाणी उचलता येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

आंद्राचे पाणी टप्प्याटप्प्याने मिळणार
आंद्रा धरणाचे निघोजे बंधारा येथून सुरुवातीला 40 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी पुढील तीन महिन्यांमध्ये वीजपुरवठ्याचे सर्व काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 100 एमएलडी पाणी उचलणे शक्य होणार आहे.

शहरासाठी आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी निघोजे बंधारा येथून उचलण्यासाठी सध्या अंतिम चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर पाणी उचलण्यात येणार आहे. सुरुवातीला एकदम 100 एमएलडी पाणी उचलणे शक्य होणार नाही. टप्प्याटप्प्याने ही क्षमता वाढविली जाणार आहे.
                                                        – शेखर सिंह, आयुक्त, महापलिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news