आशिष देशमुख
पुणे : जुन्नर तालुक्यातील किमान 50 नरभक्षक बिबट्यांचे स्थलांतर करू द्या, अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या वनमंत्र्यांना नागपूर मुख्यालयातील मुख्य वनरक्षक ए. श्रीनिवास रेड्डी यांनी पाठविले आहे. त्यावर मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पिंपरखेड (ता. शिरूर) येथील घटनेने वन विभागाचे नागपूर येथील मुख्यालयातील अधिकारी प्रथमच गंभीर झाल्याचे दिसले.(Latest Pune News)
पिंपरखेड या गावात बिबट्यांनी धुमाकूळ घालत तीन बळी घेतल्यामुळे जनक्षोभ उसळला आहे. लोकांनी वन विभागाच्या मालमत्तेची जाळपोळ करताच शासन जागे झाले. अखेर याबाबत मंगळवारी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सकाळी 10.30 वाजता राज्याच्या मुख्य वन अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. जुन्नर क्षेत्रातील किमान 50 बिबट्याचे स्थलांतर करू द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्य वनसंरक्षक करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा प्रचंड धुमाकूळ सुरू असून, आता दिवसा देखील घराबाहेर पडणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. घराबाहेर पडल्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील तीन जाणांचा बळी घेतला. त्यामुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले. त्याचे वर्णन पत्राद्वारे पुणे मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी तत्काळ पाठविले. त्यामुळे पुणे वन विभागासह नागपूर येथील मुख्यालयातील अधिकारी मुंबईच्या दिशेने बैठकीसाठी निघाले आहेत.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, जुन्नर विभाग हा सध्या अतिशय धोकादायक परिसर बनला असून, या संपूर्ण परिसरात 900 बिबट मादी असल्याचा अंदाज आहे. उसाचे मोठे क्षेत्र असल्याने लपण्यास जागा आहे. त्यामुळे वनक्षेत्र सोडून बिबटे माणसांच्या वस्तीत आले. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हेच त्यांचे भक्ष्य बनले. त्यामुळे या भागात बिबट्यांची पैदास वेगाने वाढत आहे. त्यांचे स्थलांतर, नसबंदी हे उपाय केले नसल्याने बिबट्यांची पैदास प्रचंड वेगाने वाढत आहे.
पिंपळखेड या गावातील स्थिती गंभीर झाल्याने फक्त त्या नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करून पकडा अथवा शेवटी मारा, असे आदेश द्यावे लागले; मात्र हे आदेश अपवादात्मक स्थितीमुळे दिले.
याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मंगळवारी 3 नोव्हेंबर रोजी वनमंत्री गणेश नाईक हे आमची बैठक मुंबईत घेणार आहेत.
निदान 50 बिबट्यांचे स्थलांतर करू द्या अशी मागणी आम्ही करणार आहोत.
खरे तर सहा महिन्यांपूर्वी बिबट्यांची नसबंदी आणि स्थलांतर याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठवून मागणी केली आहे.
पुणे : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्यांत बिबट्यांनी धुमाकूळ घातला. जिल्हास्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आपत्ती निधीतून त्यासाठी तत्काळ 2 कोटी उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यातून 200 पिंजरे बसविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. शिरूर तालुक्यात तिघांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, वन विभागाची सात पथके या भागांत बिबट्याचा शोध घेत आहेत. या पथकात 25 जण असून, त्यामध्ये सात शूटरचा समावेश आहे.
जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर आणि खेड तालुक्यातील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. जुन्नर भागात एका बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षांच्या मुलाचा जीव गेला. त्याचे तीव पडसाद या भागात उमटले आहेत. गावकऱ्यांमध्ये वाढता संपात आणि जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वन खात्याने काढले आहे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे आदेश वन खात्याकडून काढण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून साहित्य खरेदीसाठी चाळीस कोटींचा निधी देण्यास यापूर्वीच मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित असलेली सर्व कामे पंधरा दिवसात या गावांमध्ये पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच या गावांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच एआय कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जी कामे या भागात अपेक्षित होती. ती सर्व मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत. बिबट्यांना पकडणे आणि त्यांचे नसबंदी करून वनतारासारख्या ठिकाणी पाठविणे हे दोनच पर्याय आहेत. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या स्तरावर यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या समवेत बैठक होणार आहे. त्यामध्ये यावर निर्णय होणे अपेक्षित आहे, असेही डुडी यांनी सांगितले.