

बलभीम भोसले
दापोडी : दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. मात्र, दिवाळीतील लक्ष्मपूजनासारखा महत्त्वाचा दिवस कोरडा गेला. त्यानंतर आनंदाचा शिधा मिळाला त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, पाडवा आणि भाऊबीज हे दोन दिवस तरी आनंदात जातील म्हणून काही शिधापत्रिकाधारकांनी आनंद व्यक्त केला.
महागाई वाढीमुळे नागरिकांचे इकडे कंबरडे मोडले असून नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, या उद्दिष्टाने शिधाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा म्हणून पामतेल, साखर, चणाडाळ, रवा, अशा चार वस्तू देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. दिवाळी सुरू झाल्यामुळे आनंदाचा शिधा घेण्यासाठी रेशन दुकानावर गर्दी होत आहे. परंतु, आनंदाचा शिधा हा रेशन दुकानदारांनाच अद्याप मिळाला नसल्यामुळे नागरिकांना शिधा द्यायचा कसा? हा प्रश्न रेशन दुकानदारांना पडला आहे. चणाडाळ एक किलो, रवा एक किलो, साखर एक किलो, पामतेल एक लिटर, असा एकूण शंभर रुपयात मिळणार होता. मात्र, 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता चणाडाळ, रवा आणि साखर मिळाली तर, पामतेल घ्यायला उद्या (दि.26) बोलावले आहे.
राज्य सरकारच्या वतीने नागरिकांसाठी अनेक आश्वासनांची खैरात केली जाते. मात्र, स्वस्त धान्य दुकानदार यांना ग्राहकांशी धान्य वाटप करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. एक वस्तू आली. एक वस्तू राहिली. अशी अनेक कारणे ग्राहकांना सांगावी लागतात. संबंधित प्रशासनाच्या वतीने याबाबतीत दखल घेणे गरजेचे आहे
– विजय गुप्ता, स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशन पिंपरी चिंचवड.