आनंद वार्ता : यंदा मान्सून धो-धो बरसणार..

आनंद वार्ता : यंदा मान्सून धो-धो बरसणार..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण भारतातील शेतकर्‍यांसाठी आनंद वार्ता आहे. यंदाचा मान्सून चांगला बरसणार आहे, असा अंदाज अमेरिकन हवामान संस्था नोआपाठोपाठ रविवारी (दि.21) स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिला आहे. अल निनोचा प्रभाव एप्रिलअखेरपर्यंत संपणार आहे. त्यामुळे उन्हाळा कडक आणि त्यापाठोपाठ येणारा मान्सून 96 ते 104 टक्के बरसणार असल्याचा अंदाज दिला आहे.

मागील वर्षी जुलैच्या मध्यावर प्रशांत महासागरावर अल निनोची स्थिती प्रभावी झाली. त्यामुळे भारतीय उपखंडात खूप कमी पाऊस झाला. उत्तर भारत वगळता मध्य अन् दक्षिण भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शहरांवर उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आनंदवार्ता आली आहे.

96 ते 104 टक्के पाऊस

तीन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील नोआ या संस्थेने भारतीय मान्सून चांगला राहणार असल्याचे भाकित दिले होते. त्यानंतर रविवारी (दि.21 जानेवारी) भारतीय खासगी संस्था स्कायमेटने यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, अल निनोचा प्रभाव यंदा उन्हाळ्याच्या शेवटी संपत आहे. त्यामुळे उन्हाळा जरी कडक राहणार असला तरी पावसाळा मात्र चांगला राहिल. यंदाचा मान्सून 96 ते 104 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा जास्त होईल. कारण, भारतीय समुद्री स्थिरांक आता तठस्थ भूमिकेत आल्याने तो मान्सूनसाठी सकारात्मक ठरणार आहे.

मागच्या वर्षी 2023 चा मान्सून अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी बरसला. मात्र, 2024 मध्ये अल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो सरासरीपेक्षा जास्त पडेल, असा अंदाज आहे. प्रशांत महासागरावरील थंडीमुळे ला निनाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचा हंगाम उत्तरार्धात अधिक चांगला राहील.

– जतीन सिंग, व्यवस्थापकीय संचालक, स्कायमेट

हा अंदाज खूप लवकर दिला आहे. हवामान विभागाची स्टॅन्डर्ड ऑपरेटींग सिस्टिम आहे. त्यानुसार आम्ही अंदाज देत असतो. त्यामुळे आमचा अंदाज येण्यास वेळ लागणार आहे. या अंदाजाबाबत मी अधिक भाष्य करणार नाही. हवामान विभागाने प्रशांत महासागराच्या सध्याच्या स्थितीबाबत अभ्यासपूर्ण माहिती प्रसारित केली आहे.

– डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, आयएमडी, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news