साताऱ्याचे काळाराम मंदिर ३५० वर्षांपूर्वीचे | पुढारी

साताऱ्याचे काळाराम मंदिर ३५० वर्षांपूर्वीचे

सातारा; मीना शिंदे : सातारा शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजर गल्लीतील म्हणजेच मंगळवार पेठेतील सुमारे ३५० वर्षापूर्वीचे काळाराम मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. गुजरातमधील नर्मदा डोहात सापडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती असल्याने त्याला काळाराम मंदिर असे नाव पडले आहे. मुख्य गाभारा, सुबक व रेखीव मूर्ती, भक्कम सागवानी खांबांवर चौपाकी सभामंडप असे हे मंदिर अन् त्याचा इतिहास रामभक्तांमध्ये औत्सुक्याचा विषय ठरत आहे.

१६७२ साली लीलाधर गंगाधर गुजर यांनी काळाराम मंदिराची स्थापना केली. मंदिर उभारणीमागे आख्यायिका आहे. रामदास स्वामी सन्जनगडावर वास्तव्यास असताना सातारा शहरात भिक्षा मागायला येत असत. भिक्षा मागून थकल्यावर गुजर गल्लील गायरानात विश्रांतीसाठी थांबत. तेव्हा लीलाधर गुजर त्यांची सेवा करत. त्यावेळी त्यांना प्रभू रामचंद्र यांचा दृष्टांत झाला. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी माझ्या मूर्ती नर्मदेच्या डोहात तुला सापडतील, असे सांगितले ही कथा लीलाधर गंगाधर यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांना सांगितली. समर्थ रामदास स्वामींनी लगेच त्यांना आदेश देऊन नर्मदेच्या डोहासाठी गुजरातमध्ये पाठवले चार पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना नर्मदेच्या डोहात या काळ्या पाषाणाच्या मूर्ती सापडल्या.

या मूर्ती सातारा शहरात आणल्या गेल्या. नंतर गुढीपाडव्याला त्या मूर्तीची स्थापना सातारा शहरात मिरवणूक काढून करण्यात आली. त्यावेळी रामदास स्वामींचा पदस्पर्श या मंदिराला झाला होता. वा मंदिर उभारणीत गुजराती समाजाचे योगदान जास्त असल्यामुळे गुजराती समाजाने काळाराम मंदिर हे नाव ठेवले. मुख्य राम मंदिराच्या शेजारी हटकेश्वर मंदिर तर समोर दास मारुतीचे मंदिर आहे.

काळाराम मंदिरामध्ये रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर व श्रद्धापूर्वक केला जातो. रामनवमीला ९.३० वाजता मोठी आरती होते. या मंदिरामध्ये गंगाधर यांचे वंशज श्री रवींद्र पुरुषोत्तम शहा हे मंदिर व पूजा, उपासनेची सर्व व्यवस्था सांभाळत आले आहेत. या मंदिरामध्ये गोकुळाष्टमी, भागवत सप्ताह असे पारंपारिक उत्सवही साजरे केले जातात. या मंदिरातील मूर्तीची शृंगारिक पूजा केली जात असल्याने दररोज नक्षत्रानुसार पोशाख व आभूषणे घातली जातात. या मंदिरामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्र पारंगत श्रीकृष्णशास्त्री जोशी गेली ५५ वर्षे भागवत सप्ताह साजरा करतात व रामाची कथा सांगतात. या मंदिराची आणखी एक आख्यायिका आहे की, नवजात बाळाला रामाच्या पायावर ठेवल्यास त्या बाळाचा भाग्योदय होतो. त्रिशूल व रामाला लाभलेले नक्षत्रांचे देणे यामुळे त्या बाळाला तेज व आरोग्य लाभते.

तसेच सातारा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा भावना आहेत की, कुणाच्या घरात सर्प वगैरे निघाला तर काळाराम मंदिरात येऊन मंत्रजप केल्याने तो निघून जातो. तसेच घरात काळसर्प दोष असला तरी या काळाराम मंदिरातील मंत्राने दोष व नैराश्य निघून जाते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. काळाराम मंदिराची व्यवस्था सध्या लीलाधर गुजर यांच्या चौदाव्या पिढीतील मोहन पुरुषोत्तम शाहा (गुजर) हे पाहत आहेत.

कापूर आरतीमुळे संकटनिवारण…

या मंदिरामध्ये पारंपरिक असा रामनवमीचा उत्सव होतो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ९ दिवस आरती चालते. त्यामध्ये महाआरती, कापूर आरतीचे विशेष माहात्म्य आहे. आपल्या घरातील दुःख, संकट किंवा पीडा कापराद्वारे यज्ञात टाकायच्या व आपले गाऱ्हाणे रामापुढे मांडून निघून जायचे. कालांतराने श्रीरामांच्या आशीर्वादाने सर्व पीडा, संकटांचे निवारण होत असल्याचीही आख्यायिका असल्यामुळे कापूर आरतीचे महत्व कायम आहे.

वज्रलेप व पुनः प्राणप्रतिष्ठापना उत्सव

लिंब, ता. सातारा येथील मूर्तिकाराकडून दिनांक १७ जानेवारी रोजी मुद्रालेपन करण्यात आले. रविवार, दि. २१ रोजी सकाळी ७.३० वा. गणपती पूजन, होम हवन, दुपारी २ वाजता गुजराथी महाजनवाडा येथे रक्तदान शिबिर, दुपारी ३.३० वाजता सत्संग, ५ वाजता शोभायात्रा, सोमवार दि. २२ जानेवारी सकाळी ७.३० वाजता होम हवन, श्रीकृष्णशास्त्री जोशी यांच्या हस्ते या मूर्तीची पुन प्रतिष्ठापना, दुपारी ४ वाजता सामुदायिक रामरक्षा पठण होणार आहे. त्यामध्ये ५०० ते ७०० महिला सहभागी होणार आहेत. रात्री ८ वाजता कापूर आरती व महाप्रसाद वाटप होणार आहे. या कार्यक्रमाला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Back to top button