

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा (दिवाळी किट) दिला जात आहे. दिवाळीत हे किट मिळणे अपेक्षित होते. मात्र, दिवाळी संपली तरी शहर आणि ग्रामीण भागातील एक लाख 27 हजार 401 लाभार्थ्यांचे किट स्वस्तधान्य दुकानातच आहेत.
सव्वालाख किट आता लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत
'आनंदाचा शिधा' किटमध्ये रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल 100 रुपयांत दिले जात आहे. महागाईच्या काळात कमी किमतीत वस्तू मिळतील, या अपेक्षेने लाभार्थ्यांनी सुरुवातीला खुल्या बाजारातून खरेदी केली नव्हती. मात्र, किट वाटपाचे नियोजन फसल्याने गरजूंना खुल्या बाजारातून खरेदी करावी लागली. दिवाळीपूर्वी किमान दोन दिवस आधी किटचा पुरवठा दुकानांमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, एकाच कंपनीकडे तीन ते चार जिल्ह्यांत पुरवठ्याचे काम दिले. त्यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागात वेळेत किटचा पुरवठा झाला नाही. याचा फटका लाभार्थ्यांना बसला. त्याबरोबरच अधिकारी, स्वस्तधान्य दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे शहर आणि जिल्ह्यात 9 लाख 16 हजार 371 कुटुंब पात्र असून, त्या प्रमाणात किटची मागणी करण्यात आली होती. त्यात ग्रामीण भागात 5 लाख 85 हजार 454 लाभार्थी असून, त्यातील पाच लाख 26 हजार 920 जणांना किटचे वाटप करण्यात आले. तर अजूनही 57 हजार 931 जणांचे किट दुकानातच आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील परिमंडलामध्ये 3 लाख 30 हजार 917 लाभार्थी असून, दोन लाख 61 हजार 341 जणांना किटचे वाटप झाले, तर अजूनही 69 हजार 470 जणांचे किट दुकानांतच आहेत.
पुणे शहरात नियोजन फसले
अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरा परिमंडळात स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी अधिकारी काम करत आहेत.- त्यामुळे अन्न धान्य वितरण वेळेत होत नाही. तसेच दिवाळी किट वाटपातही गोंधळ पाहायला मिळाला.
लाभार्थी गेले गावी…
दिवाळी किट दुकानातच का आहेत, अशी विचारणा अन्नधान्य वितरण कार्यालयातील अधिकार्यांकडे केली. त्यावर लाभार्थी गावी गेले आहेत, त्यामुळे किट दुकानात आहेत, असे सांगण्यात आले.