

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तडिपारीची कारवाई झाली असताना शहरात येऊन दुचाकीवरून फिरत नाटक करुन लुटमार करणार्या सराईताला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. निखील ऊर्फ दादा शशिकांत कांबळे (वय 22, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्याला दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते.
परंतु, तरीही तो शहरात येऊन गुन्हे करत होता. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून टेम्पो, एक रिक्षा असा साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे, अमंलदार श्याम सूर्यवंशी, हेमंत पेरेणे, रहिम शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नाटक करून खिशातील पैसे काढून घेई
चोरी अन् लुटण्याची नवीन नवीन मोड्स वापरून तो गुन्हे करत होता. दुचाकीवरून एकट्या नागरिकांना गाठून त्यांना पत्ता विचारत असे. त्यानंतर माझे चुकले म्हणत थेट पाया पडण्याचे नाटक करून खिशातील पैसे काढून घेत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.