![file photo](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2Fcrime-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लोणावळा : भांडणातील आरोपीला तपासाकामी पोलिस ठाण्यामध्ये हजर राहण्याची समज दिल्याचा राग मनात धरत लोणावळा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्याला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये आठ ते दहा जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अजिज जब्बार सूब मेस्त्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल गौड, दिनेश मरवडी, आकाश चोर, विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे व इतर 2 ते 3 अज्ञात व्यक्ती (सर्व रा. ओळकाईवाडी, कुसगांव, ता. मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 जानेवारी रोजी रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास कुसगाव ओळकाईवाडी येथील मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रोडवर घडली होती. यामध्ये अजिज मेस्त्री हे जखमी झाले आहेत.
लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये 29 जानेवारी रोजी कलम 324 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामधील आरोपी अतुल गौड याला गुन्ह्याचे तपासकामी पोलिस ठाण्यामध्ये हजर राहण्याचा समज दिल्याचा राग मनात धरून विनायक शिंदे याने मेस्त्री यांना दगडाने मारहाण केली.
तर वैभव साठे याने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केली व इतरांनी हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली असल्याचे मेस्त्री यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या मारहाणीत मेस्त्री यांच्या डाव्या डोळ्याच्या खालील बाजूस फॅक्चर झाले असून, नितीन नरवडे यालाही हाताने मारहाण झाली आहे. पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.