पोपटांच्या संख्येत चिंताजनक घट

पोपटांच्या संख्येत चिंताजनक घट
Published on
Updated on

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा :  कीर, राघू, रावा, शुक, मिठू इत्यादी नावाने सर्वांना परिचित असलेल्या पोपटांची संख्या सध्या चिंताजनकरीत्या घटत चालली आहे. माणसातील वाच्यतेचे अनुकरण करण्यात तरबेज असलेले पोपट सद्य:स्थितीत नजरेस पडेनासे झाले आहेत. रंगीबेरंगी पिसारा, आकर्षक बाकदार चोच व मजबूत शरीरयष्टी लाभलेले व मनुष्यवस्तीला समीपता बाळगून वावरणार्‍या पोपटांच्या घटत्या संख्येने पक्षिमित्रांमध्ये चिंता वाढली आहे.

सिट्टॅक्युला क्रामेरी या शास्त्रीय नावाने व रोज रिंगड रोड पॅरकीट या इंग्रजी नावाने परिचित असलेले पोपट मनुष्य वस्तीत शिरून कल्ला करण्यात तरबेज असतात. भारतात आढळणार्‍या पोपटांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी सिट्टॅक्युला प्रजातीचे पोपट सर्वसामान्य आहेत. ते भारतभर निवासी पक्षी म्हणून आढळतात. हिमालयाच्या पर्वतश्रेणीतील डोंगरांवर सुमारे पंधराशे मीटर उंचीवर, पठारी भागातील मैदानी प्रदेशात, विरळ जंगलांत, शेताशिवारात, त्याचप्रमाणे शहरात, उपनगरात तसेच खेड्यापाड्यांत पोपट नेहमी आढळत असल्यामुळे हा सगळ्यांच्या माहितीचा आहे.

नर पोपटाला राघू म्हणतात व मादीला मैना म्हणतात. सर्व प्रकारची फळे व धान्य हे या पोपटांचे प्रमुख खाद्य आहे. पिकांवर व फळबागेतील फळांवर हल्ला चढवून त्याची खाण्यापेक्षा नासधूसच जास्त करण्यात रस घेतात. धान्य किंवा फळे खात असताना मधूनमधून मोठ्याने ओरडतात. खाद्य खाताना ओरडणे व उडताना कलकलाट करणे, या कारणांमुळे त्यांना कीर या नावाने ओळखतात.

पपेट शो
पोपट लीलया माणसाळतात. पोपटांतील या सवयीमुळे माणसाने त्यांचा उपयोग आपल्या उदरनिर्वाहासाठी करून घेतला आहे. पोपटांचा वापर विविध कसरतीचे खेळ, बंदूक उडविणे, पेटते मशाल चोचीत धरून गरगरीत गोल फिरविणे इत्यादी खेळ शिकवून मपपेट शोफच्या नावाखाली पैसे मिळविले जातात. काही जण पोपटाला माणसाप्रमाणे बोलायला लावतात. पुष्कळ लोक आपल्या मनोरंजनाकरिता पोपटाला पिंजर्‍यात बंदिस्त करून पाळतात. गावोगावी ज्योतिषी पोपटाला पिंजर्‍यात कोंडून माणसाचे भविष्य सांगायला वापरतात. वन्यजीव संरक्षणाचे कायदे कडक झ्याल्याने पोपटांना पिंजर्‍यात बंदिस्त करून ठेवणे कमी झाले आहे. पोपटांतील वीणकाळ जानेवारी ते मे यादरम्यान असतो. या काळात हे पक्षी मनुष्यवस्तीला समीपता साधून झाडांच्या फांद्यांवरील पोटरीत व इमारतींच्या भिंतींच्या फटीत घरटी साकारून नव्या पिढीला जन्म घालतात.

पूर्वी सगळीकडे मानवीवस्तीसह शेतशिवारात अतिसुलभतेने नजरेस पडणारे पोपटांचे थवे आता दुर्मीळ झाले असून, आपल्याला पोपट सहजासहजी नजरेस पडत नाहीत. मानवी जीवनशैलीतील बदल, अमाप वृक्षतोड, नागरीकरण, शेतीव्यवसायातील बदल इत्यादी कारणाने पोपटांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. पोपटांचे अस्तित्व टिकविण्यासाठी जनजागृती निर्माण व्हायला हवी. त्यांना नैसर्गिक अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यायला हवे.
– डॉ. अरविंद कुंभार – पक्षी व पर्यावरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news